पैठण,दिं.२६:सध्या सुरू असलेल्या गुलाबी थंडी मध्ये ग्रामीण भागात हूरडा पार्ट्या जोरात सुरू असून शहरातील नागरिक खेड्यात येऊन हूरडा पार्टी चा आनंद घेत असल्याचे चित्र सध्या जायकवाडी,ढोरकीन,कारकीन परीसरात दिसत आहे.
गुलाबी, अंगाला कापरं भरवणारी थंडी, त्यात सोबतीला शेकोटी, त्यापासून दुरावणारा गारवा आणि अशात जर गरमा गरम हुरडा मिळाला तर… वाह ! ऐकून तोंडाला पाणी सुटले ना…
हो तर सध्या सुरू आहे हुरडा पार्टीची धूम… ग्रामिण भागात अशा हुरडा पार्ट्यांची सध्या चलती आहेत… अशा गरमा गरम पार्ट्या रोजच सुरू आहेत आणि अशाच अस्सल ग्रामिण हुरडा आणि गावराण चटण्यांची चव चाखण्यासाठी शहरी पावले आपोआप गावाकडे, खेड्यांकडे वळताना दिसत आहेत. गव-यांवर केलेली शेकोटी आणि आगीच्या निखा-यांवर ठेवलेली कोवळी कोवळी ज्वारीची कणसं… ऐकून तोंडाला पाणी सुटले ना… हातावर मळून मोकळी केलेले कोवळी कोवळी ज्वारीचे दाणे आणि सोबत वेगवेगळ्या चटण्या, गावराण ठेचा यावर ताव मारल्याशिवाय मन राहणारचं नाही… आणि हे सर्व निसर्गाच्या सानिध्यात असेल तर सोनेपे सुहागाच ना… ग्रामिण भागात अशा हुरडा पार्ट्यांनी सध्या जोर धरलाय… या हुरडा पार्ट्यातून अनेक शेतक-यासह तरूणांना सध्या ढोरकीन जवळील देवगिरी हूरडा पार्टी मधून रोजगारही मिळत आहे
ग्रामीण भागात हुरड़ा पार्टी जोरात सुरू आहे, त्यामुळे शहरातील नागरिक याचा आनंद घेण्यासाठी ग्रामीण भागाकडे जातायंत… येथील निसर्गरम्य वातावरणामध्ये माणूस धकाधकीच्या जीवनातील तान-तनाव विसरून जातात, रोजचा ऑफिस वर्क, महिलांचा रोजचा दहा बाय दहा किचनमधील स्वयंपाक, मुलांची रोजची शाळा अणि ट्यूशन यातून एक वेगळेपणा, मनोरंजन आणि मनाला मिळणारा आनंद इथेच आहे असे वाटल्याशिवाय राहात नाही…
या हुरडा पार्टीत मक्याची कणसं, गावराण कोवळा ताजा हरभरा, गरमा गरम ज्वारीचा हुरड़ा, गावराण बोरं, सोबत दही आणि मसाला पापड,खाकरा,हुरडा भेळ याचा गावराण नजराणा ठेवण्यात येतो…हुरडा सोबतच तिळाची चटनी, खोबरा चटनी, शेगदाना चटनी, जवसाची चटनीही देण्यात येते आणि मग सुरू होते गरमा गरम हुरड़ा पार्टी.वेगवेगळ्या आणि गावराण आणि चविष्ट चटण्या समोर आल्या की मग काय रोजच्या सैंडविच, समोसा, पिझ्झा, पाणीपूरी यांची तुम्हाला आठवणही येणार नाही अणि त्यात जर सोबत तुमची फॅमिली किंवा मित्रांचा ग्रुप असेत तर मस्ती, मौज, मजा याचा आनंद काही औरच असतो. अशा या निसर्णरम्य वातावरणात कोणी सेल्फि किंवा फोटोशूट करणार नाही असं होणारच नाही कारण या आठवणी साठवून ठेवणं कोणाला नाही आवडणार. हुरड्याचा आणि गावराण चटण्यांचा आनंद लुटून झाला की मग तुम्हाला अस्सल गावाकडील वाहणात म्हणजे बैलगाडीतून सैरही करायला मिळते… मग रानात, माळावर अगदी झिंगाट होऊन नाचताही येतं.रानावनात भटकंती झाली की मग तुमच्यासमोर असतं ते गावराण जेवण… चुलीवर तीळ टाकून केलेली बाजरीची भाकरी, सोबत पराठा, गावराण तुपातील डाळबाटी आणि वांग्याचं भरीत… तसंच गावराण मिरच्यांचा ठेचाही आणि अस्सल गावराण चटण्याही…या चुलीवरील जेवणाला येणारा काळ्या मसाल्यांचा सुगंध बोटं चाखायला लावल्याशिवाय राहत नाही सध्या शनिवार व रविवार रोजी हूरडा पार्ट्या मोठ्या प्रमाणात होत आहे शहरी भागातील लोकांना खेड्यातील रानमेवा खान्याची संधी या हूरडा पार्टीमधुन मिळत असल्याने ते आवर्जून येतात.
————
प्रशांत जोशी(देवगिरी हूरडा पार्टी संचालक ढोरकीन) : सध्या ग्रामीण भागात एक चांगला उपक्रम उभारावा म्हणून आम्ही शेतीपासून अपारंपारीक शेती व्यवासाय सुरू केला आहे त्याचा ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसह तरूणांना रोजगार उपलब्ध होत असून शहरी भागातील लोकांना एक करमणुकीचे प्रशस्त निसर्गमय ठिकाण उपलब्ध झाले असून गावरान रानमेवासह हूरडा , चुलीवरचे गावरान जेवन उपलब्ध केले आहे.
————-
संदीप एडके (पर्यटक) : सध्या देवगिरी हूरडा पार्टी मध्ये हूरडासह विविध प्रकारच्या चटण्या व रानमेवा खायला मिळत आहे हा परीसर निसर्गरम्य असल्याने चिमुकल्यांना खेळण्यासाठी छान आहे.