थॅलेसेमियाग्रस्त रुग्णांना रक्तदान करण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज -विवेक कोल्हे

0

संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद 

कोपरगाव : थॅलेसेमिया हा रक्ताशी संबंधित अनुवंशिक व धोकादायक आजार असून, या आजाराच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. कोपरगाव तालुक्यात थॅलेसेमियाबाधित जवळपास ५० रुग्ण आढळले आहेत. थॅलेसेमिया या आजाराबाबत समाजात सर्व स्तरावर व्यापक जागृती करण्याची गरज आहे. थॅलेसेमियाच्या रुग्णाला वारंवार रक्ताची गरज भासते. त्यामुळे नागरिकांनी सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून रक्तदान करण्यासाठी पुढे आले पाहिजे. तसेच थॅलेसेमियाग्रस्त रुग्णांना रक्ताची कमतरता भासू नये म्हणून स्वयंसेवी संस्था व संघटनांनी रक्तदान शिबिरांच्या आयोजनासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे, असे आवाहन संजीवनी युवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष, युवा नेते विवेक कोल्हे यांनी केले.

जागतिक थॅलेसेमिया दिनाचे औचित्य साधून संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या वतीने आज मंगळवारी (९ मे २०२३) कोपरगाव येथील व्यापारी धर्मशाळेत आयोजित भव्य रक्तदान शिबिराचे उद्घाटन विवेक कोल्हे यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी ते बोलत होते. ‘जागवू या ज्योत माणुसकीची’ या ब्रीदवाक्यानुसार विविध समाजोपयोगी उपक्रम राबविणाऱ्या कोपरगाव येथील संजीवनी युवा प्रतिष्ठानने सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून संजीवनी ब्लड बँकेच्या सहकार्याने आयोजित केलेल्या या रक्तदान शिबिरास नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अनेक नागरिकांनी या शिबिरात स्वयंस्फूर्तीने रक्तदान केले. त्याबद्दल विवेकभैय्या कोल्हे यांनी प्रतिष्ठानच्या वतीने त्यांचे कृतज्ञतापूर्वक आभार मानले. यानिमित्ताने संजीवनी युवा प्रतिष्ठानने कोपरगाव तालुक्यातील साडेपाचशे रक्तदात्यांची माहिती पुस्तिका तयार केली असून, या पुस्तिकेचे प्रकाशन विवेक कोल्हे यांच्या हस्ते याप्रसंगी झाले. या शिबिरात रक्तदान केलेल्या रक्तदात्यांना त्यांच्या हस्ते गौरवपत्रही प्रदान करण्यात आले.

प्रारंभी विवेक कोल्हे यांनी रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त व महापराक्रमी राजे महाराणा प्रताप यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस तसेच माजी मंत्री सहकारमहर्षी स्व. शंकरराव कोल्हेसाहेब यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. याप्रसंगी संजीवनी ब्लड बँकेच्या डॉ. नीताताई पाटील, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष शरद नाना थोरात, शहराध्यक्ष दत्ता काले, माजी नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे, माजी उपनगराध्यक्ष स्वप्नील निखाडे, योगेश बागुल, माजी नगरसेवक अशोकराव लकारे, वैभव गिरमे, विवेक सोनवणे, अल्ताफभाई कुरेशी, रवींद्र रोहमारे, दीपक जपे, वैभव आढाव, प्रसाद आढाव, सुदर्शन पटेल, विनोद गलांडे, सतीश रानोडे, खलिकभाई कुरेशी, राजेंद्र बागुल, भाजप दिव्यांग आघाडीचे तालुकाध्यक्ष मुकुंदमामा काळे, सचिन सावंत, कानिफनाथ गुंजाळ, विशाल गोर्डे, विक्रांत सोनवणे, प्रमोद संवत्सरकर, रवींद्र लचुरे, प्रशांत संत, सागर राऊत, रोहन दरपेल, अनिकेत थोरात, विक्रांत खर्डे, सतीश निकम, योगेश वाघ आदींसह भाजप, भाजयुमोचे पदाधिकारी, कार्यकर्ते, संजीवनी ब्लड बँकेचे कर्मचारी, संजीवनी युवा प्रतिष्ठानचे युवा सेवक व रक्तदाते नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन व प्रास्ताविक युवा सेवक सिद्धार्थ साठे यांनी केले, तर युवा सेवक रोहित कनगरे यांनी आभार मानले.

यावेळी कोल्हे म्हणाले, जगात थॅलेसेमिया आजार असलेल्या मुलांची संख्या भारतात सर्वात जास्त असून, दरवर्षी १२ हजार थॅलेसेमियाग्रस्त मुले भारतात जन्म घेत आहेत. भारतात पाच कोटींपेक्षा जास्त थॅलेसेमिया आजाराचे वहन (कॅरिअर) करणाऱ्या म्हणजेच ‘थॅलेसेमिया मायनर’ व्यक्ती आहेत. थॅलेसेमिया आजार जनुकीय दोषांमुळे आई-वडिलांपासून त्यांच्या मुलांमध्ये पसरतो. जर आई-वडिलांना ‘थॅलेसेमिया मायनर’ असेल तर त्यांच्या मुलांनाही तो होण्याची अधिक शक्यता असते. खेळण्या-बागडण्याच्या वयात अनेक लहान मुलांना थॅलेसेमिया आजार जडत आहे. जन्मल्याच्या तीन महिन्यांनंतर त्याची लक्षणे आढळतात. थॅलेसेमिया आजार झालेल्या बाळाच्या शरीरामध्ये रक्ताची कमतरता भासते. अॅनिमिया टाळण्यासाठी थॅलेसेमियाच्या रुग्णांना वारंवार बाहेरून रक्त देण्यासह विविध प्रकारची औषधीही द्यावी लागतात. रक्तसंक्रमणाची प्रक्रिया, इतर औषधोपचार व अनुषंगिक खर्चही मोठा असतो. त्यासाठी बिकट आर्थिक परिस्थिती असलेल्या थॅलेसेमियाच्या रुग्णांना व त्यांच्या कुटुंबीयांना अनेकदा तारेवरची कसरत करावी लागते. थॅलेसेमियाच्या रुग्णांना रक्ताचा तुटवडा जाणवतो हे ओळखून संजीवनी युवा प्रतिष्ठानने सामाजिक बांधिलकी जपत खास थॅलेसेमियाच्या रुग्णांसाठी रक्तदान शिबीर आयोजित केल्याबद्दल त्यांनी सर्व युवा सेवकांचे कौतुक करून त्यांना धन्यवाद दिले. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here