‘रयत’चे माजी विद्यार्थी महेंद्र घरत यांचा शरद पवार यांच्या हस्ते सत्कार!

0

उरण (विठ्ठल ममताबादे ) : कोकणामध्ये रयत शिक्षण संस्थेचे रोपटे ७० वर्षांपूर्वी अनेक शाळा-महाविद्यालयांच्या माध्यमातून कर्मवीर अण्णांनी लावले. आज त्याचे रूपांतर वटवृक्षात झाले आहे. रामशेठ ठाकूर, महेंद्रशेठ घरत यांच्यासारख्या असंख्य विद्यार्थांचे शिक्षण ‘रयत’मुळे झाले. त्यामुळे आज ते यशाची शिखरे पादाक्रांत करीत असताना आपले आयुष्य ‘रयत’मुळेच घडले हे न विसरता कोकणातील विद्यार्थी आपल्या विभागातील शाळा-महाविद्यालयांसाठी भरीव आर्थिक मदत करतात.तसेच  पश्चिम महाराष्ट्रातील शाळा-महाविद्यालयांच्या इमारत बांधकामासाठीसुद्धा आर्थिक साह्य करीत आहेत. ‘रयत’च्या माध्यमातून अण्णांनी शिक्षणाची गंगा आणून अशी माणसे पेरली की तीच आज समाजासाठी झटत आहेत असे म्हटले तर वावगे ठरू नये असे मत अहिल्यानगर जिल्ह्यातील रयत शिक्षण संस्थेच्या चिंचोटी पाटील येथील न्यू इंग्लिश स्कूलच्या  उदघाटनप्रसंगी माजी कृषिमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे संस्थापक नेते शरद पवार यांनी व्यक्त केले. त्यांच्या हस्ते चिंचोटी पाटील येथील न्यू इंग्लिश स्कूल विद्यालयाच्या नूतन इमारतीचे उदघाटन रविवारी (ता. 16 )झाले त्यावेळी ते बोलत होते.

चिचोंटी पाटील गाव अवर्षणग्रस्त भागात आहे त्यामुळे तेथील महाविद्यालयाचे काम रखडू नये म्हणून आंतरराष्ट्रीय कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांनी आर्थिक साह्य केले. त्यामुळेच महेंद्रशेठ घरत यांचा शरद पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी प्रमुख पाहुणे घरत म्हणाले, रयत शिक्षण संस्थेमधून मिळालेले संस्कार व उच्च दर्जाच्या शिक्षणामुळेच आमच्यासारखे लाखो गरीब विद्यार्थी शिकू शकले. मी आज आंतरराष्ट्रीय पातळीवर आयओएल, आयटीएफ संघटनांवर लीलया काम करतोय. हे केवळ ‘रयत’मुळेच घडले म्हणूनच ‘रयत’चे उत्तरदायित्व होण्यासाठी ‘रयत’ला शक्य तेवढे आर्थिक साह्य करून खारीचा वाटा उचलत आहे मी माझे कर्तव्य करीत आहे.साहित्यिक आणि माजी विद्यार्थी डाॅ. संजय कळमकर यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या.

 कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रयत शिक्षण संस्थेचे (सातारा) व्हाईस चेअरमन भगीरथ शिंदे होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार आशुतोष काळे, माजी आमदार दादाभाऊ कळमकर, दरेकर नाना, माजी मंत्री बबनराव पाचपुते, राजेंद्र फाळके, नगरचे माजी  सभापती प्रवीण कोकाटे, सरपंच शरद पवार, आप्पासाहेब पवार, फकिरा पवार आदी मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक आबासाहेब कोकाटे यांनी केले तर आभार प्राचार्य सी. डी. शिंदे यांनी मानले.आंतरराष्ट्रीय कामगार नेते महेंद्र घरत यांनी आजपर्यंत अनेक ठिकाणी मदतीचा हात दिला आहे. सहकार्य केले आहे. त्यांच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here