संशोधन संचालक डॉ. सुनिल गोरंटीवार उत्कृष्ट शास्त्रज्ञ पुरस्काराने सन्मानीत

आंतरराष्ट्रीय नियतकालीकांमध्ये 31 शोध निबंध, राष्ट्रीय नियतकालीकांमध्ये 123 शोध निबंध प्रकाशीत

0

राहुरी विद्यापीठ दि. 15 डिसेंबर, 2022
महाराष्ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषद, पुणे आणि राज्यातील चारही कृषि विद्यापीठे यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ, दापोली येथे तीन दिवसीय संयुक्त कृषि संशोधन आणि विकास समितीची 50 वी बैठक सुरु आहे. या बैठकीच्या
उद्घाटन कार्यक्रमात महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे संशोधन संचालक तथा कृषि अभियांत्रिकी विभाग प्रमुख डॉ. सुनिल गोरंटीवार यांना राज्याचे कृषि मंत्री तथा चारही कृषि विद्यापीठांचे प्रतिकुलपती अब्दुल सत्तार यांच्या शुभहस्ते उत्कृष्ट शास्त्रज्ञ पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. याप्रसंगी महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील, दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. संजय सावंत, परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. इंद्र मणी, अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. शरद गडाख व महाराष्ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषदेचे महासंचालक श्री. रावसाहेब भागडे उपस्थित होते.
डॉ. गोरंटीवार हे महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथे संशोधन संचालक म्हणुन कार्यरत असून जागतिक बँक अर्थसहाय्यीत कास्ट प्रकल्पाचे प्रमुख समन्वयक म्हणुन ते काम पहात आहेत. डॉ. गोरंटीवार यांनी विद्यापीठामध्ये सहाय्यक प्राध्यापक या पदावर आपली सेवा
सुरु केली असून त्यांच्या 38 वर्षाच्या सेवेत त्यांनी विविध पदांवर काम केले आहे. डॉ. सुनिल गोरंटीवार यांनी सन 1996 मध्ये युनायटेड किंगडम येथील लॉफबरो विद्यापीठातून जल अभियांत्रिकी व विकास केंद्र या विषयात आचार्य पदवी संपादन केली असून पुढील उच्च पदव्युत्तर आचार्य पदवी याच विद्यापीठातून 2002 व 2006 मध्ये मिळविली आहे. त्यांनी आतांपर्यंत 7 आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय प्रकल्प पूर्ण केले असून 4् प्रकल्पांमध्ये सध्या काम सुरु आहे. त्यांचे आंतरराष्ट्रीय नियतकालीकांमध्ये 31 शोध निबंध, राष्ट्रीय नियतकालीकांमध्ये 123 शोध निबंध प्रकाशीत झालेले आहेत. त्यांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिसंवादात 100 पेक्षा जास्त संशोधन पेपरांचे सादरीकरण केले आहे. त्यांची आंतरराष्ट्रीय स्तरावर 6 पुस्तके व राष्ट्रीय स्तरावर 2 पुस्तके प्रकाशीत झालेली आहे. तसेच त्यांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध समित्यांमध्ये महत्वाच्या पदावर काम केले आहे. नुकतीच भारत सरकारच्या कृषि व शेतकरी कल्याण मंत्रालयाद्वारे स्थापन केलेल्या ड्रोन संबंधीत कमीटीवर त्यांची सदस्य म्हणुन भारत सरकारने नेमणूक केली आहे. संशोधनावर आधारित 15 मोबाईल अ‍ॅप, कॉपी राईट 25 तसेच संशोधनावर आधारित 9 वेब अ‍ॅप्लीकेशन तयार केले आहेत. डॉ. सुनिल गोरंटीवार यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल सर्वत्र त्यांचे अभिनंदन होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here