उरण दि 15(विठ्ठल ममताबादे ) : जन्माला येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मरण हे अटळ आहेच.कोणतीही व्यक्ती अमर नाही परंतु एखाद्या व्यक्तीच्या अचानक जाण्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळतो.अशातच शेतकरी कामगार पक्षाचे निष्ठावान आणि ज्येष्ठ कार्यकर्ते, माजी आदर्श मुख्याध्यापक , सारडे गावचे माजी सेक्रेटरी , दहागाव माजी विद्यार्थी संघ पिरकोनचे माजी सदस्य ,सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक संघटनेचे सदस्य ,सारडे – वशेनी दोन गाव खाडी कमिटीचे अध्यक्ष, गाव पंच , सामाजिक कार्यकर्ते , गोर- गरिबांना सढल हाताने मदत करणारे प्रामाणिक दाते , प्रेमळ आणि मनमिळावू असे स्मितहास्य व्यक्तिमत्व , वडिलधारे म्हणून आपल्या कुटुंबाला आधार देणारे वटवृक्ष ,रायगड जिल्ह्यामध्ये आपल्या शिक्षकी पेशातून प्रत्येक माणसांमध्ये माणुसकी जपणारे शांत ,संयमी आणि सर्वांचे लाडके आप्पा म्हणजेच कै. छ.ल.पाटील (गुरुजी) यांचे वयाच्या 76 व्या वर्षी दिनांक – 13 जून 2023 रोजी आकस्मिक दुःखद निधन झाले.त्यांच्या पश्चात त्यांची दोन मुले,दोन मुली,नातवंडे,सुना, नातसुना, जावई असा मोठा परिवार आहे त्यांचा दशक्रिया विधी गुरुवार दिनांक 22 जून 2023 रोजी श्री क्षेत्र नाशिक येथे होणार आहे तर उत्तरकार्य विधी रविवार दिनांक 25 जून 2023 रोजी राहत्या घरी सारडे येथे होणार आहे.आपल्या कुटूंबाला आणि संपूर्ण पाटील कुटुंबाला नेहमीच एकत्रित बांधण्याचे काम त्यांनी केले. सारडे गावातील आणि पूर्व परिसरातील अनेक सामाजिक,शैक्षणिक,संस्थामध्ये मोलाचं सहकार्य आणि सहभाग त्यांचा नेहमीच लाभत असे.गावातील सेक्रेटरी हे पद बरीच वर्ष जबाबदारीने सांभाळून गावातील न्यायनिवडा करत गाव तंटामुक्त कसा राहील यासाठी त्यांनी सतत प्रयत्न केले.सेवानिवृत्त माजी मुख्याध्यापक असून सुद्धा त्यांच्या मनामध्ये समाजाविषयीची आत्मीयता कधी कमी झाली नाही.एक चालतं बोलतं व्यक्तिमत्व म्हणून सर्वजण त्यांच्याकडे पाहत होते. अशा या समाजशील व्यक्तीचे अचानक जाण्याने सर्वत्र दुःख आणि हळहळ व्यक्त केली जात आहे.