मागण्या मान्य न झाल्यास समुद्रात उतरून निषेध नोंदवत ग्रामस्थ मासेमारी करणार.
उरण दि. 16 (विठ्ठल ममताबादे ) 38 वर्षे उलटूनही हनुमान कोळीवाडा ग्रामस्थांचे योग्य पुनवर्सन झाले नाही. शिवाय त्यांना कोणत्याही प्रकारचे नुकसान भरपाई मिळाले नाही. नोकरी नाही, रोजगार नाही त्यामुळे हनुमान कोळीवाडा ग्रामस्थांवर उपासमारीची वेळ आल्याने संतप्त ग्रामस्थांनी आमची आम्हाला मूळ जमीन परत दया आम्हाला पुनवर्सन नको आम्हाला आमची जमीन परत दया अशी साद घालत उरणचे तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांची भेट घेतली. व समस्या त्वरित सोडविण्याची मागणी केली.शेवा कोळीवाडा गावातील ग्रामस्थ 38 वर्षापासून हनुमान कोळीवाडा गावात वास्तव्यास आहेत. मात्र पुनर्वसन होत नसल्याने शेवटी मूळ गावात जाउन राहण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे.8/1/2023 पासून ग्रामस्थ आपल्या मूळ गावात म्हणजेच शेवा कोळीवाडा गावात ठाण मांडून आहेत. मागण्या पूर्ण होत नसल्याने सोमवार दिनांक 16/1/2023 रोजी उरण तहसील कार्यालयात लोकशाही दिन असल्याने हनुमान कोळीवाडा गावातील ग्रामस्थांनी आम्हाला पुनवर्सन नको आम्हाला आमची जमीन परत पाहिजे या मागणीसाठी उरणचे तहसिलदार भाऊसाहेब अंधारे यांची भेट घेतली. व सदरची समस्या सोडविण्याची मागणी केली.मात्र तहसिलदार भाउसाहेब अंधारे यांनी शिक्षक मतदार संघाचे निवडणूक आचारसंहिता असल्याचे सांगत लोकशाही दिन पुढे ढकलले आहे.अशी माहिती ग्रामस्थांना मिळताच ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी पसरली.आपल्याला न्याय मिळेल या आशेने हनुमान कोळीवाडा गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने तहसील कार्यालयाच्या आवारात उपस्थित होते.मात्र यावेळीही त्यांच्या पदरी घोर निराशा पडली.256 कुटुंबाच्या पुनर्वसनाचा प्रश्न पुन्हा एकदा यामुळे ऐरणीवर आला आहे.
वर्षानुवर्षे पुनवर्सनाच्या बाबतीत प्रशासन चालढकल करत असल्याचा आरोप यावेळी ग्रामस्थांनी प्रशासनावर केला आहे. प्रशासन नेहमी जागूण बुजून हनुमान कोळीवाडा ग्रामस्थांवर अन्याय करत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. मोरा ते घारापूरी समुद्रात आम्ही आमच्या मासेमारीच्या जागेत एकच वेळी बायका पोरांसह बोटीत जाऊन मासेमारी करू असे रमेश कोळी यांनी यावेळी सांगितले.
कोट (चौकट ):-
जोपर्यंत ग्रामस्थांच्या सर्व मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत हा लढा असाच सुरु राहील.आमची शासनाने फसवणूक केलेली आहे. आता आम्हाला पुनवर्सन नको. आम्ही आमच्या गावात शेवा कोळीवाडा गावात घरे बांधून राहण्याचा निर्णय घेतला आहे. शासनाच्या उदासीन धोरणामुळे गोरगरिब जनतेवर उपासमारीची वेळ आली आहे
-रमेश कोळी.
मच्छीमार नेते.
आमची बाजू सत्याची असून आमच्या येथे सर्व कागदपत्रे आहेत.38 वर्षे शासनाच्या विविध शासकीय कार्यालयात वेळोवेळी पाठपुरावा करून सुध्दा, शांततेच्या व कायदेशीर मार्गाने लढून सुद्धा न्याय मिळत नसल्याने सर्व ग्रामस्थांनी शेवा कोळीवाडा गावात कायमचे वास्तव्य करण्याचा निर्णय घेतला आहे.आम्ही आमच्या हक्कासाठी शेवटपर्यंत लढणार आहोत.
– सरपंच परमानंद कोळी, हनुमान कोळीवाडा ग्रामपंचायत
कोळीवाडा ग्रामस्थांचा प्रश्न शासनाला सोडवायचाच नसल्याने हनुमान कोळीवाडा ग्रामस्थांच्या पदरात नेहमी ऊपेक्षाच पाहायला मिळाली आहे.पुनर्वसनाच्या बाबतीत शासन कोणतेही ठोस भूमिका घेताना दिसून येत नाही.ग्रामस्थांची कोणतेही चूक नसताना ग्रामस्थांना वेठीस धरण्याचे शासनाचे प्रयत्न सुरु आहेत.
– मंगेश कोळी, ग्रामस्थ
हनुमान कोळीवाडा ग्रामस्थांनी विविध समस्या संदर्भात आज माझी भेट घेतली असून त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी आमचे नेहमी प्राधान्य राहिले आहे. त्यांच्या समस्या मी वरिष्ठाना कळविले आहेत.
– भाऊसाहेब अंधारे
तहसीलदार, उरण.