सिन्नर प्रतिनिधी : नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यात वडांगळी गावात जावयाची गाढवावरून धिंड काढण्याची प्रथा आहे. दरवर्षी प्रमाणे यंदाही ग्रामस्थांनी जावयाची धिंड करून जल्लोष साजरा केला.
वडांगळी येथे धुलिवंदन ते रंगपंचमी या काळात जावयाची धिंड काढण्याची चालत आलेली शेकडो वर्षांची प्रथा टिकवण्याचा गावकरी प्रयत्न करतात.
वडांगळीकरांना रंगपंचमीच्या दिवशी बुधवारी जावई मिळाला. यंदाच्या या अनोख्या प्रथेचे मानकरी मूळचे नांदूरमधमेश्वर येथील आणि सध्या वडांगळी येथे इलेक्ट्रिकचं दुकान चालवणारे रामेश्वर शिंदे हे ठरले. गाढवावरून धिंड काढण्यासाठी जावई मिळाल्याने सर्वांनीच आनंद व्यक्त करत जल्लोष केला.
रामेश्वर शिंदे हे संदीप भोकनळ यांचे जावई आहेत. त्यांची उत्साहात गाढवावरून गावात धिंड काढण्यात आली. रितीरिवाजानुसार, सुपाचे बाशिंग, कांदा लसणाच्या मुंडावळ्या, गळ्यात तुटक्या चपलांचा हार, चेहऱ्याला विविध प्रकारचे रंग अशाप्रकारे जावयाला सजवून गाढवावरून बसवून वाजतगाजत, रंगाची उधळण करत मिरवणूक काढण्यात आली. गेल्या २ वर्षापासून ही प्रथा खंडित होती. वडांगळी येथे रामेश्वर शिंदे हे आढळून आले. धिंडीनंतर सासऱ्याच्या घरासमोर त्यांना अंघोळ घालण्यात आली. त्याशिवाय जावयाचा मानपानही करण्यात आला.
३६०० रूपये देऊन आणले गाढव…
जावयाबरोबर सध्याच्या काळात गाढव मिळवणे हीदेखील मोठी समस्या असते. परंतु निफाड तालुक्यातील सायखेडा येथून २१०० रूपये गाढवाचे भाडे आणि १५०० रूपये गाडीभाडे देऊन भाडेतत्वावर गाढव आणण्यात आले. रंगपंचमीचा दिवस आणि त्यात जावयाची धिंड म्हणजे दुग्धशर्करा योग वडांगळी गावकऱ्यांना अनुभवायस मिळाला.