उरण दि 29 ( विठ्ठल ममताबादे) : कोकणाला 720 किलोमीटरचा समुद्र किनारा लाभला असून समुद्रात मासेमारी करणारे मच्छीमार बांधव व मासेमारी व्यवसायावर अवलंबून असलेले जहाज, बोट,नौका वाहक चालक कामगार, मच्छी विक्रेते आदींची संख्या कोकण किनार पट्टीवर मोठ्या प्रमाणात आहे. या मच्छीमार बांधवाच्या विविध समस्या वर्षानुवर्षे प्रलंबितच आहेत. तसेच नवनविन होणाऱ्या कायदयामूळे मच्छीमार बांधवांच्या मूलभूत हक्क व अधिकारावर गदा येत असून नैसर्गिक संकटाबरोबरच मानवनिर्मित संकटालाही या मच्छीमार बांधवाना सामोरे जावे लागत आहे. एकंदरीत मच्छिमार बांधवांचे अस्तित्वच धोक्यात आले आहे. त्यामुळे मच्छीमार बांधवांच्या विविध समस्या सोडविण्याच्या अनुषंगाने व मच्छीमार बांधवाना त्यांचे न्याय व हक्क मिळवून देण्याच्या उद्देशाने सी. आय.टि. यू या डाव्या विचाराच्या संघटनेतर्फे मंगळवार दि 6 जून 2023 रोजी सकाळी 10 वाजता मल्टीपर्पज हॉल जे. एन.पी. टी. टाउनशीप उरण येथे कोकण किनारा मच्छीमार संघटनेची स्थापना करण्यात येणार आहे.या कार्यक्रमाला अखिल भारतीय सी आय टी.यूचे अध्यक्ष कॉ. के हेमलता,सी आय टी यूचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष डॉ. डी. एल कराड, महाराष्ट्र राज्य जनरल सेक्रेटरी एम. एच.शेख, महाराष्ट्र राज्य सेक्रेटरी भूषण पाटील, फॉरवर्ड सिमेन्स यूनियनचे अध्यक्ष मनोज जाधव, रायगड जिल्हाध्यक्ष मधूसूदन म्हात्रे,जिल्हा परिषद सदस्य रविंद्र पाटील , माजी निवृत्त शिक्षण स्तर अधिकारी विनायक म्हात्रे, फॉरवर्ड सिमेन्स यूनियन उपाध्यक्ष शुशिल देवरुखकर, सी. आय.टी यू मुंबई अध्यक्ष के नारायणन, रायगड सेक्रेटरी शशि यादव हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तरी जास्तीत जास्त मच्छीमार बांधवांनी या नविन संघटनेच्या स्थापना सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन निमंत्रक संदिप पाटील, सुरेश कोळी, मारुती पाटील,दिलीप पाटील, काशिनाथ पाटील यांनी केले आहे.