सातारा/अनिल वीर : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन संघटनेतर्फे अंधश्रद्धाना बळी न पडता योग्य उमेदवाराला मतदान करा.असा संदेश देणारा व्हिडिओ मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांच्याकडून प्रसारित करण्यात आला आहे.
सध्या महाराष्ट्रामध्ये ग्रामपंचायत निवडणूका सुरू आहेत. या निवडणुकांच्या लढती अत्यंत अटीतटीच्या होतात. त्यामुळे काही उमेदवार हे प्रतिस्पर्धी उमेदवार व मतदारांवर दबाव निर्माण करण्यासाठी अंधश्रद्धेचे प्रकार करतात. निवडणूक काळात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडे अशा अनेक तक्रारी येतात. ‘सिस्टमिक वोटर्स एज्युकेशन अँड इलेक्ट्रोरल पार्टीसिपेशन’ अर्थात ‘स्वीप’ या शासनाच्या उपक्रमांतर्गत होणाऱ्या संवाद कार्यक्रमांच्या वेळी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी हा प्रकार मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांच्या निदर्शनास आणून दिला. मतदारांच्या मनात अंधश्रद्धेची भीती निर्माण करणाऱ्या प्रकारांमध्ये नारळावर हात ठेवून विशिष्ट व्यक्तीला मत देण्याची शपथ घ्यायला लावणे.देवाचा भंडारा- अंगारा उचलून मत देण्याविषयी शपथ घ्यायला लावणे. विरोधी उमेदवाराच्या अंगणात काळी बाहुली, लिंबू मिरची व नारळ याचा उतारा टाकणे. विरोधी उमेदवारावर तथाकथित काळी जादू-करणीचा प्रकार करणे.जवळच्या प्रसिद्ध देवस्थानावर मतदारांना घेऊन जाऊन पुजाऱ्याकडून शपथ घ्यायला लावणे. मांत्रिक- तंत्रिकांना गावामध्ये बोलावून महिला मतदारांवर दबाव निर्माण करणे. असे निखळ अंधश्रद्धेचे अनेक प्रकार सध्या निवडणूक काळात घडत आहेत. मतदारांवर दबाव टाकण्यात येत असल्याने हे प्रकार आदर्श निवडणूक आचारसंहितेचा भंग करणारे आहेत. तसेच जादूटोणा विरोधी कायद्यानुसार देखील असे प्रकार करून दहशत निर्माण करणे हा गुन्हा आहे. तेव्हा याची दखल घेत ‘निवडणूक काळात मतदारांनी कोणत्याही अंधश्रद्धेच्या प्रकाराला बळी पडू नये. निर्भिडपणे योग्य उमेदवाराला मतदान करावे. असे आवाहन एक व्हिडिओ प्रसारित करून मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांनी केले आहे. मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांच्या अधिकृत यूट्यूब, फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम द्वारा हा व्हिडिओ प्रसारित करण्यात आला आहे. ‘मराठी किडा’ या युट्युब चॅनेलचे प्रसिद्ध यूट्यूबर सुरज खटावकर यांनी मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांच्यासाठी हा व्हिडीओ बनवला आहे. या व्हिडिओमध्ये कोकणात मतदारांना नारळावर शपथ घेऊन मतदान करण्यास भाग पाडले जाते. यावर विनोदी अंगाने प्रबोधन केले आहे. यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांचे अभिनंदन करीत आहे. अंनिस संपूर्ण महाराष्ट्राभर या व्हिडिओचा प्रसार करण्यात येणार आहे.ग्रामपंचायत निवडणूक काळात कोठे मतदारांवर दबाव टाकण्यासाठी अंधश्रद्धेचे प्रकार आढळल्यास महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीशी संपर्क करावा. असे आवाहन अंनिसच्यावतीने मुक्ता दाभोलकर, राजीव देशपांडे,राहुल थोरात,मिलिंद देशमुख, प्रशांत पोतदार व नंदिनी जाधव यांनी केले आहे.