मा नगरसेवक सुभाष जगताप यांच्या प्रयत्नांना यश पुणे : शहरातील नविन रस्ता तळजाई पठार सर्व्हे नं ७ येथील रहदारीचा रस्ता स्थानिक बांधकाम व्यावसायिकाने खोदल्यामुळे या परिसरात राहणाऱ्या नागरिकांची गैरसोय झाली होती . याबाबत नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी व क्षोभ होता याबाबत दैनिक लोकप्रभातने वृत्त प्रसिद्ध करीत सर्व सामान्य नागरिकांच्या व्यथा मांडल्या होत्या . तसेच केल्यामुळे स्थानिक मा नगरसेवक सुभाष जगताप यांनी याबातचा पाठपुरवठा केल्याने प्रशासनाने दखल घेत रस्ता पूर्ववत करून दिला .
या खोदलेल्या रस्त्यामुळे आजूबाजूच्या नागरिकांना ये जा करण्यासाठी तसेच वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद झाला होता . शालेय विद्यार्थी आणि जेष्ठ नागरिकांना प्रचंड अडचणींना सामोरे जावे लागत होते. खोदलेला रस्ता पूर्ववत करून देण्याची मागणीसाठी या भागातील कलाजगत मित्र मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तसेच संध्या छाया सोसायटीच्या नागरिकांनी मा. नगरसेवक सुभाष जगताप यांची भेट घेतली. सर्वांनी सहकारनगर पोलीस स्टेशन येथे जाऊन तक्रार केली व त्यानंतर प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी करून, महानगर पालिकेच्या अधिकाऱ्यांना बोलवून या गंभीर परिस्थितीची कल्पना दिली. यावेळी बांधकाम व्यावसायिकाचे प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी सुभाष जगताप यांनी या प्रतिनिधीला या गंभीर प्रकाराबद्दल जाब विचारला व पुढे होणाऱ्या कारवाई बद्दल त्याला जाणीव करून दिली. यानंतर बांधकाम व्यावसायिकाने रस्ता पूर्ववत करून देण्याचे कबूल केले. गेले २ ते ३ दिवस या प्रकरणाचा पाठपुरावा करून आज बांधकाम व्यावसायिकाने सिमेंट काँक्रीटचा रस्ता तयार करून दिला. पूर्वी पेक्षा मोठा आणि रुंद रस्ता तयार करण्यात आल्यामुळे स्थानिक नागरिकांनी आनंद व्यक्त केला. मा. नगरसेवक सुभाष जगताप यांनी केलेल्या प्रयत्नांनी हा प्रश्न मार्गी लागल्यामुळे स्थानिक नागरिकांनी मा. नगरसेवक जगताप आणि दैनिक लोकप्रभातचेही आभार मानले .