तीर्थरुप दादा : दिपस्तंभ

0


स्वतंत्र भारताच्या इतिहासात महाराष्ट्राचे मोठे स्थान आहे. महाराष्ट्र हा जसा डोंगर,दर्‍या खोर्‍या, समुद्रकिनारा अशा विविधतेने नटलेला आहे. तसाच तो मोठ्या कर्तबगार व्यक्तींची जन्मभमी व कर्मभमीही राहिला आहे. छञपती शिवाजी महाराज,राजर्षी शाहू महाराज,महात्मा फुले,डॉ.बाबासाहेब आंबेडकर, संत, महाराजे,कवी,लेखक,साहित्यीक ते यशवंतराव चव्हाण,वसंतदादा पाटील यांच्या नेतृत्वापर्यंत सर्वांनी आपल्या कार्यातून छाप सोडली आहे.या सर्वांच्या विचाराचा पगडा असणारे स्व.भाऊसाहेब संतुजी थोरात उर्फ तीर्थरुप दादा यांच्या व्यक्तीमत्वाची जडण – घडण स्व.डॉ अण्णासाहेब शिंदे यांच्या बरोबरीने स्वातंत्र्य चळवळीच्या मुशीत झाली. स्वातंत्र्य आंदोलनात महत्वाची भूमिका बजावणार्‍या दादांनी स्वातंत्र्य प्राप्तीनंतर सहकाराचा मार्ग निवडला. सहकारातून गोरगरिबांचे जिवनमान उंचविण्यासाठी रचनात्मक कार्यातून सहकाराला नवी दिशा दिली. प्रगतीचा राजमार्ग असणार्‍या सहकारात पारदर्शकता,आर्थिक शिस्त,काटकसर,आधुनिकता व समाजउपयोगिता हे नवे तत्वे राबवितांना एक नवा मंत्र दिला.  यशस्वितेसाठी प्रत्येकाच्या जिवनात मार्गदर्शकाची भूमिका महत्वाची असते. तीच भूमिका माझ्या जिवनात व तालुक्याच्या सर्वांगिण विकासात दादांची राहिली.दादांनी सहकार हा आपल्या कुटूंबाच्या पलिकडे जपला. तो वाढविला आणि कार्यकर्त्यांची मोठी फळी निर्माण केली.
             महाविद्यालयीन शिक्षण पुर्ण झाल्यानंतर मी संगमनेरला वकिलीची प्रॅक्टीस सुरु करायला लागलो. दादांचे सहकार व समाजकार्य सुरु होते. या काळात विडी कामगारांच्या आंदोलनात मी सहभाग घेतला. औरंगाबाद विद्यापीठ नामांतर,कामगार ,विडी आंदोलनातील सहभाग यामुळे माझा समाजकार्याला प्रारंभ झाला. पुढे दादांनी शेतकर्‍यांना जोडधंदा म्हणून सुरु केलेल्या दुग्ध व्यवसायाचा १९८२ पासून आम्ही तरुण मुले प्रचार प्रसार करु लागलो. गावोगावी बैठका , मेळावे घेवून तालुक्यात दुध संस्था सुरु केल्या.
१९८५ ची विधानसभा निवडणूक माझ्या जीवनात मैलाचा दगड ठरली. जनतेच्या आग्रहास्तव मला अपक्ष म्हणून कार्यकर्त्यांनी निवडणूकीत उतरविले. काँग्रेस पक्षाच्या विरोधात जाणे दादांना कधीच मान्य नव्हते. त्यामुळे त्यांनी माझ्या प्रचारात सहभागही घेतला नाही. ते आपल्या तत्वाशी कायम एकनिष्ठ राहिले.१९८५ ची निवडणूक जिंकल्यानंतर समाजकरणाचे काम करतांना दादांची कार्यपद्धती हीच आपल्यासाठी दिपस्तंभाप्रमाणे ठरली. साधी राहणी,पारदर्शक कारभार,सतत लोकांची कामे करणे हा मंत्र मी जपला.त्यानंतर पुढे दिवसेनदिवस कार्यकर्त्यांचा संग्रह वाढत गेला. तालुक्यातील वाडी वस्ती, नदी, नाले,रस्ते,डोंगर दर्‍या यांची भौगोलिक माहिती झाली. यामुळे विकासकामांच्या विविध योजना मार्गी लावतांना मोठा उपयोग झाला.तालुक्यासाठी व तळेगांव भागासाठी असलेले निळवंडे धरण पुर्ण होणे हे दादांचे स्वप्न होते. यासाठी आ.मधुकरराव पिचड यांच्या सहकार्याने हे काम मार्गी लावण्यास मी प्राधान्य दिले. दादांची तालुक्याच्या विकासाबाबत सहकारावर करडी नजर होती. ते नेहमीच म्हणत सहकारी संस्था ह्या मुलांप्रमाणे सांभाळा. या संस्थांमध्ये विश्‍वस्त म्हणून काम करतांना आपल्याला काय देता येईल ते योगदान द्या.त्यातून संस्था वाढतील व त्याचा जनसामान्यांना फायदा होईल.दादांची स्मरणशक्ती आफाट होती. कार्यकर्त्यांना ते अगदी नावानिशी हाक मारत प्रेरणा देत,आळस,अंधश्रद्धा,नकारात्मक दृष्टीकोन या सर्वांचा त्यांना राग होता.

विज्ञानवादी वारकरी असलेले दादा हे साहित्याचे मोठे चाहते होते. विविध क्षेत्रातील मान्यवरांना कार्यक्षेत्रावर बोलावून ते त्यांचे मार्गदर्शन सर्वांसाठी घडवून आणत. यामध्ये यशंवतराव चव्हाण,वसंतदादा पाटील,विलासराव देशमुख, य.दी, फडके, राम कदम, ना.धो. महानोर, डॉ.विठ्ठल वाघ,नामदेव ढसाळ,नारायण सुर्वे,माजी पंतप्रधान चंद्रशेखर या दिग्गजांचा समावेश राहिला.दादांना कधीही खोटे आवडले नाही. स्पष्टवक्तेपणा हे त्यांचे मोठे गुणवैशिष्ट्य राहिले. कधीही चुकीच्या गोष्टींना त्यांनी पाठीशी घातले नाही. त्यामुळे आमच्या सारख्या सर्व कार्यकर्त्यांना एक मोठी शिस्त लागली. आम्हाला वैचारिक अधिष्ठान लाभले. चांगली कामे करतांना या सकारात्मक विचाराचे मोठे पाठबळ मिळाले.तालुक्याच्या विकासाच्या प्रत्येक टप्प्यावर त्यांचे माार्गदर्शन महत्वाचे राहिले.१९९९ मध्ये काँग्रेस व राष्ट्रवादीच्या विभाजनावेळी दादांनी राष्ट्रीय काँग्रेस पक्षात राहण्याचा दुरदृष्टी निर्णय घेतला. त्यांची काँग्रेसच्या विचारांवर निष्ठा होती. १९९९ मध्ये स्व.विलासरााव देशमुख यांच्या मंत्री मंडळात मी आवडीचे पाटबंधारे खाते मागावून घेतले. निळवंडे धरणाच्या कामाला प्रारंभ केला. आधी पुनर्रवसन मग धरण हा अनोखा पॅर्टन राबवितांना आमची जार्वे येथील ५ एकर जमिन दिली. या कामातील अडथळे माजी मंत्री मधुकरराव पिचड यांच्या सहकार्यातून दूर केले.  अनेक अडथळ्याांवर मात करत निळवंडे धरण पुर्ण केले. या कामाची पाहणी करण्यासाठी दादा वेळोवेळी निळवंडे धरणाला भेट देत राहिले. आदिवासी पुनर्रवसीत यांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी पुढाकार घेत राहिले.२००४ मध्ये कृषी मंत्री पद सांभाळतांना शासनाच्या विविध योजना शेतकर्‍यांच्या बांधावर पोहचवा हा मोलाचा सल्ला दिला. मी राज्यभर फिरुन दुष्काळात शेतकर्‍यांना मदत करत होतो. या काळात शेतीत विविध नविन योजना राबविल्या गेल्या. १ लाख शेततळ्यांची निर्मीती, महापीक अभियानातून, २००६ मध्ये राज्यात आतापर्यंतचे सर्वाधीक कृषी उत्पन्न झाले. मंत्री मंडळात विविध खाती सांभाळतांना दादांची काम करण्याची शैली मोठी मार्गदर्शक ठरली. दिवसाची सुरुवात सकाळी ६ ते रात्री १२ पर्यंत सातत्याने दौरे,बैठका,कार्यकर्त्यांच्या भेटी गाठी,जनतेची कामे मार्गी लावणे या सर्व गोष्टींना प्राधान्य दिले. कधीही विश्रांती घेतली नाही.
संगमनेर तालुक्यातही विकासाच्या अनेक योजना राबविल्या जात होत्या. सहकारी संस्था आर्थिक दृष्ट्या सक्षम बनविणे,त्या पारदर्शक व आदर्शवत चालविणे  हे आम्हा कार्यकर्त्यांचे काम आम्ही चोखपणे पार पाडत होतो. २००६ मध्ये दादांनी पर्यावरण संवर्धनासाठी वयाच्या ८४ व्या वर्षी दंडकारण्य अभियान रााबविले. तालुक्यातील सर्व जनता,विद्यार्थ्यांच्या सहभागाने हे अभियान आता मोठी लोकचळवळ झाले आहे.दरवर्षी कोटी बियांचे रोपन करुन वृक्षसंवर्धन आणि वृक्षसंगोपणाची संस्कृती तालुक्यात वाढली आहे. या अभियानाची आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल घेण्यात आली.
देशातील , राज्यातील व विविध क्षेत्रातील मान्यवरांनी या अभियान आंदोलनाचे कौतुक केले आहे. दादांनी अगदी शेवटच्या श्‍वासापर्यंत या तालुक्याचा विकास हाच ध्यास जपतांना कार्यकर्त्यांना सदैव बळ दिले. अगदी आजारपणातही प्रत्येक कार्यकर्त्याची काळजी घेतली. दृढनिश्‍चयी व स्पष्ट वक्ते असलेल्या दादांच्या जिवन कार्यावर अमेय प्रकाशनने दादांनी लिहिलेले अमृतगाथा व अमृतमंथन ही जिवनचरित्रे नव्या पिढीसाठी प्रेरणास्त्रोत ठरली.१४ मार्च २०१० रोजी स्व.तिर्थरुप दादांच्या जाण्याने माझ्यासह तालुक्याच्या जिवनात मोठी पोकळी निर्माण झाली. एक दिपस्तंभ हरपला. मात्र त्यांचे विचार सदैव पाठीशी ठेवून आम्ही सदैव काम करत राहिलो. निकोप व सुसंस्कृत राजकारणाची मोठी परंपरा निर्माण करुन तालुका राज्यात विकासाचे मॉडेल ठरला. यासाठी मंत्रीपदाच्या काळात प्रत्येक खात्याला न्याय दिला. महसूलखात्याला तर अगदी लिम्का बुक ऑफ रेकॉर्डने गौरविण्यात आले. निळवंडे धरणाचे काम पूर्ण करुन कालव्यांची कामे अंतिम टप्प्यात आणली आहे. ऑक्टोबर २०२२ मध्येच दुष्काळी शेतकर्‍यांच्या शेतात पाणी देण्याचे आपले स्वप्न होते. यासाठी रात्र दिवस कालव्यांची कामे सुरु होती. मात्र आता ही कामे थंडावली असली तरी या कामांचा पाठपुरावा करुन दुष्काळी भागाला निळवंडेचे पाणी देणे आणि गोर गरिब व सर्व सामान्यांच्या जिवनात सदैव आनंद निर्माण करण्यासाठी अविश्रांतणे काम करतच राहणार आहे. या सर्वात तीर्थरुप दादांचे विचार, तत्व आणि जिवनकार्य सदैव दिपस्तंभाप्रमाणे प्रेरणा देत  आहे.

                                                      आमदार बाळासाहेब थोरात

                                                        ( शब्दांकन – चंद्रकांत शिंदे)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here