उरण दि १(विठ्ठल ममताबादे ) : उरण आगारातील बस हे पागोटे गावाजवळून सोडण्यात यावे अशी मागणी ग्रामपंचायत पागोटे मार्फत दि १५/३/२०२३ रोजी पत्रव्यवहार करून करण्यात आली होती.यासाठी पागोटे ग्रामपंचायतने विशेष पुढाकार घेतला. पागोटे ग्रामपंचायतच्या मागणीला आता यश प्राप्त झाले असून काही दिवसातच उरण महामंडळच्या बसेस पागोटे गावाजवळून जाणार आहेत. त्यामुळे प्रवाशी वर्गांना यामुळे खूप मोठा दिलासा मिळणार आहे.
मौजे पागोटे गावासाठी महामंडळ उरण आगारातर्फे बस सेवा चालू केली होती परंतु काही कारणास्तव ती पाच ते सहा वर्षापूर्वीच बंद करण्यात आली आहे. पागोटे कुंडेगाव नवघर या गावातील शाळकरी विद्यार्थी पुढील शिक्षणाकरिता फुंडे हायस्कूल व इतर शाळेमध्ये जात असून त्यांना बससेवेचा उपयोग होत होता. सदर शाळेचे अंतर चार ते पाच किलोमीटर असल्याने त्यांना चालत प्रवास करावा लागत आहे. गावाशेजारी मोठमोठाले कंटेनर यार्ड वसल्याने कंटेनर वाहनांची वर्दळ जास्त असून पायी प्रवास करणारे विद्यार्थी, ग्रामस्थ व नोकरी निमित्त इतर ठिकाणी जाणारा नोकर वर्ग यांना आपला जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. नवघर गाव ते नवघर फाटा हा पूर्वी चालू असलेला रस्ता आत्ता रेल्वेच्या कामामुळे बंद केल्याने पागोटे व कुंडेगाव येथील शाळकरी विद्यार्थी, ग्रामस्थ व नोकर वर्ग यांना नवघर गावा जवळील ब्रिजवरून वळसा घालून शाळेत व इतर गावात जाण्यासाठी एसटीने प्रवास करण्यासाठी नवघर येथील बस स्टॉप येथे जावे लागत असल्याने त्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
शाळकरी विद्यार्थी, ग्रामस्थ व नोकरी निमित जाणारे नोकरवर्ग यांना होणाऱ्या त्रासाची दखल घेऊन त्यांचा प्रवास सुखमय होण्यासाठी पूर्व भागात जाणाऱ्या बसेस (उदाहरणार्थ खोपटा, आवरे, चिरनेर)या मार्गावरील बसेस पागोटे गावाकडून वळवून मार्गस्थ केल्यास शाळकरी विद्यार्थी, ग्रामस्थ व नोकरवर्ग यांची प्रवासाची मोठी समस्या दूर होऊन जाईल.तरी पागोटे गावाकरिता सकाळी ७ वा. दुपारी ११ वा.व संध्याकाळी ५ वा. या वेळेनुसार बससेवा चालू करण्यात यावी अशी मागणी पागोटे ग्रामपंचायत मार्फत करण्यात आली होती.आता या मागणीला यश आले आहे.नुकतेच पागोटे ग्रामपंचायतचे सरपंच कुणाल पाटील, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांनी बस आगार प्रमुख सतीश मालचे यांची भेट घेतली. लवकरच पागोटे गाव येथे बस सुरु करू असे आश्वासन बस आगार प्रमुख यांनी सरपंच कुणाल पाटील व ग्रामस्थांना दिले.