अवघ्या 18 वर्षांचा गुकेश बनला बुद्धिबळाचा वर्ल्ड चॅम्पियन !

0

सिंगापूर : भारताचा युवा ग्रॅंड मास्टर डी. गुकेश बुद्धिबळाच्या पटावरचा नवा राजा ठरला आहे. गुकेशनं चीनच्या डिंग लिरेनला हरवून विश्वविजेतेपद मिळवलं.

याआधी भारताकडून केवळ विश्वनाथन आनंदलाच बुद्धिबळाचं जगज्जेतेपद मिळवता आलं होतं. त्यानंतर 11 वर्षांनी गुकेशनं ही कामगिरी बजावली. तसंच अठरा वर्षांचा गुकेश बुद्धिबळातला आजवरचा सर्वात युवा जगज्जेता ठरला आहे. सिंगापूरमध्ये झालेल्या विश्वविजेतेपदाच्या लढतीत गुकेश आणि लिरेन एकूण चौदा गेम्समध्ये खेळले. त्यात तेराव्या गेम्सनंतर दोघं प्रत्येकी साडेसहा गुणांसह बरोबरीत होते.

अखेरचा गेमही बरोबरीत सुटेल असं वाटू लागलं होतं. पण गुकेश शेवटपर्यंत खेळत राहिला आणि त्यांनं अखेर लिरेनवर मात केली. गुकेशच्या यशानं भारताच्या बुद्धिबळातल्या वर्चस्वावर शिक्कामोर्तब केलं आहे. गेल्या काही वर्षांत गुकेशसह प्रज्ञानंद, अर्जुन एरिगसी अशा युवा बुद्धिबळपटूंनी अनेक मोठ्या स्पर्धांमध्ये बाजी मारली आहे.

चेन्नईत राहणाऱ्या डोम्माराजू गुकेशनं जेमतेम दहा वर्षांपूर्वीच बुद्धिबळ खेळण्यास सुरुवात केली होती गुकेशचे वडील रजनीकांत पेशानं ENT सर्जन (कान, नाक, घशाचे तज्ज्ञ) आहेत तर आई पद्माकुमारी मायक्रोबायोलॉजिस्ट आहेत आणि मद्रास मेडिकल कॉलेजमध्ये त्या शिकवतात. हे कुटुंब मूळचं आंध्र प्रदेशातलं. रजनीकांत यांनी मुलाच्या करियरवर लक्ष देण्यासाठी सध्या आपलं काम बंद केलं आहे. तेच गुकेशला वेगवेगळ्या शहरांत, देशांत स्परर्धेसाठी घेऊन जातात.

लहान असतानाच गुकेश आपल्या वयापेक्षा मोठ्या प्रतिस्पर्ध्यांनाही सहज हरवू लागला. 2015 साली त्यानं गोव्यात राष्ट्रीय शालेय विजेतेपद मिळवलं आणि पुढची दोन वर्ष त्यानं हे विजेतेपद कायम राखलं.

2016 साली गुकेशनं कॉमनवेल्थ चेस चॅम्पियनशिपचं सुवर्ण जिंकलं, दोनच वर्षांनी 2018 साली बारा वर्षांचा असताना त्यानं वर्ल्ड यूथ चेस चॅम्पियनशिप जिंकली.

2017 साली गुकेशला पहिल्यांदा इंटरनॅशनल चेस फेडरेशन (FIDE किंवा फिडे)चं रेटिंग मिळालं. त्यानं गुकेशला मोठी प्रेरणा मिळावी असं त्याचे वडील सांगतात.

ग्रँडमास्टर बनणं हे प्रत्येक बुद्धिबळपटूचं स्वप्न असतं. गुलकेशचं हे स्वप्न 2019 मध्ये पूर्ण झालं.

ग्रँडमास्टर पद मिळवणारा गुकेश सर्वात युवा भारतीय आणि जगातला तोवरचा दुसरा सर्वात युवा बुद्धिबळपटू ठरला. तेव्हापासून त्याची आगेकूच सुरू आहे.

2021 साली गुकेशनं युरोपियन क्लब कप जिंकला, त्या स्पर्धेदरम्यान त्यानं मॅग्नस कार्लसनचा सामना केला.

2022 साली आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्य पदक मिळवणाऱ्या बुद्धिबळ संघात गुकेशचा समावेश होता.

त्याच वर्षी भारतात बुद्धिबळ ऑलिंपियाडचं आयोजन करण्यात आलं होतं, तेव्हा गुकेशनं ब गटातून सुवर्णपदक मिळवलं होतं.

तसंच 2023 च्या चेस वर्ल्ड कपमध्येही त्यानं उपांत्यपूर्व फेरी गाठली, पण माजी जगज्जेता मॅग्नस कार्लसनकडून त्याला पराभूत व्हावं लागलं. पण त्या यशाचं फळही लवकर मिळालं.

सप्टेंबर 2023 च्या रेटिंग लिस्ट मध्ये गुकेशनं अधिकृतरित्या विश्वनाथन आनंदला मागे टाकलं आणि तो भारताचा नंबर वन बुद्धिबळपटू बनला. जवळपास 37 वर्ष आनंद भारतात अव्वल स्थानावर होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here