प्रसिद्ध भारतीय माजी कसोटीपटू सलीम दुर्राणी यांचे आज निधन झाले. ते 88 वर्षांचे होते. सलीम दुर्राणींची एक ओळख होती, ती म्हणजे प्रेक्षकांनी मागणी केली तर त्यांच्या मागणीचा मान ठेवून ठरवून सिक्सर मारू शकत असत. त्यांच्या या वैशिष्ट्यामुळे ते लोकांच्या गळ्यातील ताईत बनले होते.
ते आपल्या काळात एक प्रसिद्ध अष्टपैलू खेळाडू म्हणून नावाजले होते. 1973 मध्ये इंग्लंडचा भारत दौरा होता. त्या मालिकेसाठी दुर्राणींना वगळण्यात आलं होतं तर संपूर्ण शहरात पोस्टर लागले होते ‘नो दुर्राणी, नो टेस्ट’, यावरून आपल्याला त्यांच्या लोकप्रियतेची कल्पना येऊ शकते.
सलीम दुर्राणींच्या क्रिकेट कारकीर्दीतील आकडेवारीवर नजर टाकली तर ती आकडेवारी फारच सामान्य वाटते. 29 टेस्ट, 1202 रन्स, एक शतक, 25.04 रनांची सरासरी आणि 75 विकेट्स. पण ज्या लोकांनी त्यांना खेळताना पाहिलं आहे किंवा जे लोक त्यांच्यासोबत खेळले आहेत त्यांच्यासाठी तर आकड्यांहून धादांत खोटं तर काहीच नसेल.
ते निश्चितपणे भारताच्या प्रतिभावान आणि स्टाइलिश खेळाडूंपैकी एक होते. उंचेपुरे असलेले आणि निळ्या डोळ्यांचे दुर्राणी जिथेही जात तिथे त्यांच्यावर चाहत्यांचा गराडा पडत असे.
प्रेक्षकांची ज्या स्टॅंडमधून मागणी आली की इकडे सिक्सर मारा त्याच दिशेला ते अगदी अचूकपणे सिक्सर ठोकू शकत. त्यांनी ही किमया कशी साधली होती हा तेव्हा आणि आता देखील एक कुतूहलाचा विषय आहे.