एखाद्या देशाचे जागतिक स्तरावरील महत्व दर्शविणारा एक महत्त्वपूर्ण पैलू म्हणजे त्या देशाचा जागतिक पातळीवरील क्रीडा क्षेत्रातील महत्त्वपूर्ण विजय ! एखाद्या देशाची आर्थिक प्रगती,राजकीय स्थित्यंतरे,जागतिक स्थान या पेक्षा त्या देशाने सध्यस्थितीत क्रीडा क्षेत्रात मिळविलेले विजय दृश्यमान स्वरूपात त्या देशाला जागतिक प्रतिष्ठा मिळवून देतात.युरोप खंडातील स्पेन या देशासाठी १४ जुलै २०२४ ही तारीख सुवर्णक्षण ठरली.१४-१५ जुलैच्या रात्री स्पेनने जागतिक स्तरावरील दोन महत्त्वपूर्ण स्पर्धा जिंकल्या.
स्पेनच्या २१ वर्षीय कार्ल अल्कारेज याने विम्बल्डन टेनिसच्या अंतिम फेरीत सर्बियाच्या नोव्हाक जोकोविच याचा ६-२,६-२,७-४ अशा तीन सरळ सेट मध्ये पराभव करून विजेतेपद पटकाविले.मागील वर्षी २०२३ मध्ये देखील त्याने जोकोवीचला पराभूत केले होते. विम्बल्डन मधील जोकोविचच्या ३४ विनिंग स्टिकला तोडण्याचे काम अल्कारेजने केले.लॉन टेनिस म्हणजे जगातील टॉप फाईव्ह मधील महत्त्वपूर्ण खेळ. या खेळात अल्कारेजच्या रूपाने स्पेनने जागतिक दबदबा निर्माण केला आहे.
इंग्लंड मधील विम्बल्डनच्या या फायनल नंतर क्रीडा रसिकांचे लक्ष लागले होते ते त्याच रात्री होणाऱ्या युरो चषक फुटबॉलच्या अंतिम सामन्यावर.या सामन्यात अंतिम दोन संघ होते स्पेन आणि इंग्लंड.युरोच्या प्राथमिक फेरीपासून सलग सात सामने जिंकून स्पेन अपराजित होता.थोड्याच वेळापूर्वी अल्कारेजने विम्बल्डन जिंकून दिल्यानंतर आता फुटबॉल संघाकडून अपेक्षा होती युरो चषक उंचावण्याची.ही लढत स्पेनला जागतिक प्रतिष्ठा मिळवून देणारी होती.समोरही हॅरी केन च्या रूपाने इंग्लंडचा तगडा संघ होता.सेकंड हापच्या सुरुवातीलाच ४७ व्या मिनिटाला स्पेनच्या नेको विलियम्स ने गोल करून स्टेडियमवर स्पेन समर्थकांमध्ये उत्साह भरला.सामना अतिशय रंगतदार झाला होता.७३ व्या मिनिटाला इंग्लंडच्या कोल पामर ने गोल करून हम भी कुछ कम नही हे दाखवून दिले.अंतिम सामना १-१ अशा बरोबरीत जाऊन अतिरिक्त वेळेत खेळावा लागणार हे निश्चित असताना ८६ व्या मिनिटाला स्पेनच्या मिकेल ओयारजाबल ने स्पेन साठी निर्णायक गोल करून स्पेनचे विजेतेपद निश्चित केले.निर्धारित ९० मिनिटानंतरचा इंज्यूरी टाईम संपल्यावर स्टेडियममध्ये स्पेन समर्थकांनी विजयी जल्लोष केला.गोल पोस्टवर अचूक हल्ला,एकमेकांशी समन्वय राखणारी लयबद्ध पासिंग,गोल वाचविणारी मजबूत डिफेन्स या बळावर स्पेनचा संघ युरो चषक विजेता ठरला.
एकाच रात्री विम्बल्डन टायटल आणि त्याच रात्री युरो चषकाचे विजेतेपद पटकावीत स्पेनने जागतिक क्रीडा क्षेत्रात एक सुवर्ण योग साधला. ५ लाख ५ हजार ९९० चौरस किलोमीटर क्षेत्रफळ असलेल्या आणि ४ कोटी ७४ लाख म्हणजे महाराष्ट्राच्या लोकसंख्येची अर्धी लोकसंख्या असलेल्या स्पेनने मिळविलेले हे दैदिप्यमान यश खरोखरचं कौतुकास्पद आहे.जगातील नंबर एकचा खेळ असणारा आणि २११ देश खेळत असलेल्या फुटबॉल मध्ये भारताचे स्थान १२४ च्या जवळपास म्हणजे अदखलपात्र आहे.तर लॉन टेनिस मध्ये लिअँडर पेस,महेश भूपती,सानिया मिर्झा यांचे दुहेरीतील यश आपले लज्जा रक्षण करणारे होते.इन-मीन २० देश खेळत असलेल्या क्रिकेटच्या टी-२० या प्रकारातील विजेतेपद आपल्यासाठी खूप मोठे वाटते.त्याचाच आपण प्रचंड गाजावाजा केला.
क्षेत्रफळानुसार भारताच्या सहा पट लहान असलेल्या आणि लोकसंख्येनुसार भारताच्या २८ पट लहान असलेल्या स्पेनचे हे सुवर्ण क्रीडा यश निश्चितच आपणासाठी आत्मचिंतन करावयास लावणारे आहे,नाही का?
@ उज्वलकुमार भारतीय.