ट्वेन्टी20 प्रकारात जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या सूर्यकुमार यादवला न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी संघात स्थान मिळालं आहे. बीसीसीआयने न्यूझीलंडविरुद्धची ट्वेन्टी20 आणि वनडे मालिका तसंच ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटींसाठी संघ जाहीर केला.
न्यूझीलंडविरुद्धच्या ट्वेन्टी20 मालिकेसाठी कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली हे संघात नाहीयेत. हार्दिक पंड्याच्या नेतृत्वात भारतीय संघ खेळणार आहे. डोमेस्टिक क्रिकेटमध्ये खोऱ्याने धावा करणाऱ्या पृथ्वी शॉ याचं संघात पुनरागमन झालं आहे. के.एल.राहुल आणि अक्षर पटेल हे दोघे न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेसाठी वैयक्तिक कारणांमुळे उपलब्ध नसल्यामुळे त्यांची निवड करण्यात आलेली नाही.
गाडीला झालेल्या अपघातामुळे विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंतवर उपचार सुरु आहेत. पंत खेळू शकणार नसल्याने कसोटी संघात के.एस.भरत आणि इशान किशन यांना समाविष्ट करण्यात आलं आहे.
गेले पाच महिने दुखापतीमुळे मैदानापासून दूर असलेल्या रवींद्र जडेजाचंही पुनरागमन झालं आहे. मात्र फिटनेस चाचणीनंतर त्याच्या समावेशाबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल. दुखापतीतून पूर्ण न सावरल्यामुळे वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहची कोणत्याही संघात निवड झालेली नाही.