पॅरिस : भारताच्या पुरुष हॉकी टीमनं पॅरिस ऑलिंपिकमध्ये कांस्यपदकाची कमाई केली आहे.कांस्यपदकासाठीच्या लढतीत भारतानं स्पेनवर 2-1 असा विजय साजरा केला आणि सलग दुसऱ्या ऑलिंपिकमध्ये तिसरं स्थान मिळवलं. हॉकीमध्ये भारताचं हे आजवरचं एकूण तेरावं पदक ठरलं आहे. ऑलिंपिकच्या इतिहासात भारतानं आता हॉकीत 8 सुवर्ण, एक रौप्य आणि 4 कांस्यपदकं मिळवली आहेत.
52 वर्षांत पहिल्यांदाच भारतानं सलग दोन ऑलिंपिकमध्ये पदकं मिळवली आहेत. याआधी टोकियो ऑलिंपिकमध्येही भारतानं कांस्यपदकाची कमाई केली होती. आजचा सामना हा भारताचा स्टार गोलकीपर आणि माजी कर्णधार श्रीजेशचा अखेरचा सामना होता.
भारताच्या अमन सहरावतनं पॅरिस ऑलिंपिकमध्ये कुस्तीच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे.
अमन या ऑलिंपिकमध्ये खेळणारा एकमेव पुरुष पैलवान आहे. त्यानं 57 वदजनी गटात अल्बानियाच्या जालिखान अबा करोव्हला हरवून उपांत्य फेरी गाठली. त्याआधी त्यानं व्लादिमीर इगोरेफला हरवलं होतं.आता उपांत्य फेरीत अमनला जपानच्या रेई हिगुचीचा सामना करायचा आहे. भारतीय वेळेनुसार ही कुस्ती रात्री 9:45 नंतर सुरू होईल.
अंतिम पंघालवर शिस्तभंगाची कारवाई
पैलवान अंतिम पंघाल आणि तिच्या संपूर्ण सपोर्ट स्टाफला पॅरिस ऑलिंपिकमधून भारतात परत पाठवलं जाणार आहे.अंतिम पंघालने तिचं ऑलिंपिक व्हिलेज अॅक्रेडिटेशन (एक प्रकारचा पास) बहिणीला दिलं होतं. नियमांनुसार आपलं अॅक्रेडिटेशन दुसऱ्याला देता येत नाही.