येवला प्रतिनिधी…..
येथील उपजिल्हा रुग्णालयात राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमातर्गत विविध आजाराच्या १६ विद्यार्थ्यांवर मोफत शस्त्रक्रिया करण्यात आल्या.यातील नऊ विद्यार्थ्यांवर जिभेच्या शस्त्रक्रिया झाल्याने अडखळत बोलणारे विद्यार्थी आता व्यवस्थितपणे बोलू शकणार आहे.योजनेत मोफत शस्त्रक्रिया करण्यात आल्याने ही योजना बालकांच्या आरोग्यासाठी आधारवड ठरली आहे.
उपजिल्हा रुग्णालय येथील राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम अंतर्गत शालेय आरोग्य तपासणी करणाऱ्या पथकाने शालेय आरोग्य तपासणी दरम्यान संदर्भित केलेल्या विद्यार्थ्यांसाठी मोफत शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शालेय आरोग्य तपासणी पथकाने शहरी व ग्रामीण भागातल्या शाळांमध्ये जाऊन विविध आजारांची तपासणी केली होती.यात छोट्या शस्त्रक्रियेची गरज असलेल्या विद्यार्थ्यांची निवड करून त्यांच्यासाठी शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले.
या शस्त्रक्रिया शिबिरात एकूण १६ विद्यार्थ्यांवर वेगवेगळ्या प्रकारच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या. या शस्त्रक्रिया शिबिरासाठी नाशिक जिल्हा रुग्णालयाचे सर्जन डॉ. प्रवीण गडसिंग, भूलतज्ञ डॉ. वानखेडे तसेच येथील उपजिल्हा रुग्णालयातील अस्थिरोग तज्ञ डॉ. मुक्तानंद नुक्ते यांनी सदर विद्यार्थ्यांवर शस्त्रक्रिया केल्या. या शस्त्रक्रियांमध्ये ९ विद्यार्थ्यांवर टंग टाय रिलीज शस्त्रक्रिया करण्यात आली तर सात विद्यार्थ्यांवर शरीरातील विविध गाठीशी संबंधित शस्त्रक्रिया पार पडल्या.सर्वसामान्य कुटुंबातील हे विद्यार्थी असल्याने शासनाच्या योजनेच्या माध्यमातून अल्पवयात निदान होऊन या मुलांवर शस्त्रक्रिया झाल्याने पालकांनाही मोठा दिलासा मिळाला असून विद्यार्थ्यांनाही स्वास्थ्यासाठी योजनेचा लाभ झाला आहे.
उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. रमाकांत सोनवणे,मेट्रन पोर्णिमा चंद्रात्रे यांचे यासाठी मार्गदर्शन मिळाले. शस्त्रक्रिया शिबिर यशस्वी होण्यासाठी उपजिल्हा रुग्णालयाच्या वंदना कोळपे,मंगल शिंदे तसेच राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सीमा सोनवणे,डॉ.राकेश गावित,डॉ. नितीन जाधव,डॉ. वृषाली पवार,डॉ. स्वाती शेळके,औषध निर्माण अधिकारी शोभा वाघ,रामेश्वरी कडतन,शिवानी शिंदे,परिचारिका कविता जाधव,सोनाली वैराळ,ज्योती कुबेरजी,आफरीन खान यांनी परिश्रम घेतले.
दरम्यान,ग्रामीण भागात विविध शाळांमध्ये विद्यार्थ्याच्या वार्षिक तपासणीत आढळलेल्या इतर आजारांवर देखील औषध उपचार करण्यात आले आहे.यापूर्वी उपजिल्हा रुग्णालयात बोलवून त्यांच्यावर हव्या त्या तपासण्या तसेच उपचार झाल्याची माहिती यावेळी देण्यात आली.