सोनेवाडी श्री वीरभद्र बिरोबा मंदिरातील घटना.. सोन्या चांदीच्या दागिन्यासह 50 हजार रुपयाची लुट
कोपरगाव ( वार्ताहर) : कोपरगाव तालुक्यातील सोनेवाडी येथील जागृत देवस्थान म्हणून ओळख असलेल्या श्री विरभद्र बिरोबा महाराज मंदिरातील दानपेटी चोरट्याने पेटीचे कुलूप तोडत दानपेटीतील सोन्या चांदीच्या दागिन्यासह 50 हजार रुपयाची रोकड लांबवली. ही घटना शनिवार दिनांक 23 डिसेंबर रोजी उघड झाली. विरभद्र बिरोबा महाराजांचा यात्रा उत्सव संपल्यानंतर हिशोबाच्या दिवशी बिरोबा यात्रा कमिटी व ग्रामस्थांच्या उपस्थितीत दानपेटी उघडण्याचा निर्णय झाला होता. ग्रामस्थ पेटी उघडण्याच्या तयारीत असताना त्यांना पेटीचे कुलूप दुसरे असल्याचे लक्षात आले. त्यांनी ते कुलूप उघडले असता आत मध्ये त्यांना काहीच मिळून न आल्यामुळे पेटीतील गेल्या तीन वर्षापासूनचा असलेला सर्व ऐवज चोरट्यांनी चोरी केले असल्याचे लक्षात आले.
कोरोना काळापासून ही पेटी ग्रामस्थांनी उघडली नव्हती. बिरोबा यात्रा उत्सव सालाबाद प्रमाणे दरवर्षी भाविकांच्या मोठ्या उपस्थित भरला जातो. पंचक्रोशीतील भाविकही या यात्रेला गर्दी करतात. ही दानपेटी पूर्ण भरल्यावरच उघडू असा ग्रामस्थांचा निर्णय झाला होता त्यामुळे तीन वर्षापासून ही दानपेटी उघडलेली नव्हती. याचाच मोका साधून चोरट्यांनी ही दानपेटी एकाच दिवसात साफ केली.दानपेटी मधील सर्व रक्कम व सोन्या-चांदीचे दागिने काढल्यानंतर या चोरट्यांनी नवीन कुलूप पुन्हा जैसे तैसे दानपेटीला लावून दिल्यामुळे ही पेटी फोडल्याचे ग्रामस्थांच्या लक्षात आले नव्हते.अखेर हिशोबाच्या दिवशी ही बाब लक्षात आली.
दरवर्षी बिरोबा यात्रा उत्सवाच्या निमित्ताने नवस बोललेले भाविक गुंजा दोन गुंजा, ग्रॅम दोन ग्रॅम सोने व चांदीचे दागिने या दानपेटीत टाकत असल्याचे बिरोबा यात्रा उत्सव मंडळाच्या वतीने सांगण्यात आले.बिरोबा मंदिरात दानपेटी फोडण्याची ही पहिलीच घटना झाली असून कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनने या चोरट्यांचा शोध घेऊन त्यांना जेरबंद करावे अशी मागणी उपसरपंच संजय गुडघे, निरंजन गुडघे, तंटामुक्त मुक्त समितीचे अध्यक्ष राजेंद्र गुडघे, पोलीस पाटील दगू गुडघे, संतोष गुडघे,भिमराज गुडघे, मारुती आव्हाड, संजय गुडघे, सचिन गुडघे, नवनाथ गुडघे, गणेश साबळे, आण्णासाहेब कांदळकर , संतोष गुडघे, सुनील शिंदे यांच्यासह यात्रा कमिटी व सोनेवाडी ग्रामस्थांनी केली आहे.