ठाण्यात नववर्षाच्या रेव्ह पार्टीवर पोलिसांचा छापा

0

९५ तरुण तरुणींसह लाखो रुपयांचे अमली पदार्थ जप्त

ठाणे : नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला (31 डिसेंबर 2023) ठाण्यातील कसारवडवली गावाजवळ खाडी परिसरात पोलिसांनी रेव्ह पार्टीत धाड टाकली. ठाणे पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाने ही कारवाई केली असून या रेव्ह पार्टीत पोलिसांनी 95 जणांना ताब्यात घेतले आहे. ठाण्यातील कसारवडवली खाडीनजीक लोकवस्ती नसलेल्या ठिकाणी रेव्ह पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. पोलिसांनी पहाटे 3 वाजता ही रेव्ह पार्टी उद्ध्वस्त केली. यावेळी पोलिसांनी 90 मुलं, 5 मुली आणि 2 आयोजकांना अटक केली आहे. तेजस कुबल आणि सुजल महाजन या दोन तरुणांना पोलिसांनी रेव्ह पार्टीचं आयोजन केल्याप्रकरणी अटक केली आहे. या पार्टीतून पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर ड्रग्ज आणि दारुचा साठा जप्त केला आहे.

ठाण्यात खाडीपासून जवळपास 300 मीटरच्या अंतरावर जंगलासारख्या परिसरात रेव्ह पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. रात्री साधारण 10 वाजता पार्टीला सुरुवात झाली. लोकवस्तीपासून लांब असलेल्या भागात या पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. ठाणे पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण युनिटला रेव्ह पार्टी सुरू असल्याची टीप मिळाली. यानंतर पोलिसांच्या सहा ते सात टीम तयार करण्यात आल्या. रेव्ह पार्टीचं ठिकाण मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचला आणि पहाटे 3 वाजता या पार्टीत धाड टाकली.

90 तरुण आणि 5 तरुणी या पार्टीत सहभागी झाले होते. पोलीस त्याठिकाणी पोहचले त्यावेळी ड्रग्ज आणि दारुचं सेवन सुरू होतं. अंमली पदार्थाचे सेवन करून तरुण मद्यधुंद अवस्थेत डीजेच्या गाण्यावर थिरकत असताना आढळून आल्याचं पोलिसांनी सांगितलं. तसंच पोलिसांनी एलएसडी स्ट्रीप्स, एलएसडी टॅबलेट्स, एमडी, गांजा, कोकेन जप्त केलं असून मोठ्या प्रमाणात दारुचा साठाही जप्त केला आहे.

या रेव्ह पार्टीचं आयोजन करणारा तेजस कुबल 23 वर्षांचा आहे, तर कळव्याचा सुजल महाजन हा सुद्धा तरुण मुलगा आहे. यापूर्वीही आयोजकाने गोव्याला अशाच एका पार्टीचं आयोजन केल्याची माहिती आहे, असं पोलिसांनी सांगितलं.

पोलीस उपायुक्त शिवराज पाटील यांनी यासंदर्भात पत्रकार परिषदेत माहिती दिली. या दोघांच्या ताब्यात एकूण 8 लाख 3 हजार 560 रुपये किमतीचा चरस, 70 ग्रॅम चरस, एलएसडी 0.41 ग्रॅम, एस्कैंटसी पिल्स 2.10 ग्रॅम, गांजा 200 ग्रॅम, बिअर, वाईन, व्हिस्की, असा अंमली पदार्थ आणि मद्य विक्रीकरता बाळगल्याचे आढळले असल्याची माहिती तसंच घटनास्थळावरून गांजा पिण्याचे साहित्य साधने, डीजे मशिन, 29 मोटार सायकली पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.ठाणे पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाने ताब्यात घेतलेल्या सर्वांविरोधात एनडीपीएस अॅक्ट, महाराष्ट्र दारुबंदी कायदयाच्या कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

विरोधकांची मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांवर टीका

ठाण्यातील रेव्ह पार्टीच्या कारवाईनंतर यावरून आता विरोधकांनी मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केलं आहे. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी यावरून सरकारवर टीका केली आहे. ते म्हणाले, “संपूर्ण राज्य ड्रग्जच्या विळख्यात सापडलेलं आहे. अंमली पदार्थ, जुगार, ड्रग्ज हे राज्यात सुरू आहे आणि राज्य उद्ध्वस्त होत चाललं आहे. प्रत्येकाचं लक्ष तिजोरी लुटण्यामध्ये आहे. गृहखात्याचं कुठेही लक्ष नाही, निष्क्रीय खातं झालं आहे. “देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाल्यावर त्यांची पकड कमकुवत होत चालली काय? मुख्यमंत्र्यांच्या ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक हा प्रकार आहे कारण कुणाचाही कंट्रोल राहिलेला नाही.”

खासदार संजय राऊत यांनी सरकारच रेव्ह पार्टीतून निर्माण झाल्याचं म्हटलं आहे.

माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, “सरकार म्हणजेच एक नशा आहे. सरकारच रेव्ह पार्टीतून निर्माण झालंय. कॅबीनेट नाही रेव्ह पार्टीच आहे ती. पैशातून निर्माण झालेलं सरकार आहे. आजच्या महाराष्ट्रात नशेचा व्यापार सुरू आहे. गुजरातमधून राज्यात ड्रग्ज आहेत. महाराष्ट्रातून उद्योग गुजरातमध्ये जातायत आणि तिकडून ड्रग्ज येतायत. महाराष्ट्राचा पंजाब करायचा प्रयत्न सुरू आहे.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here