साई संस्थानच्या दोन कर्मचाऱ्यांची चाकूने भोसकून हत्या
शिर्डी प्रतिनिधी : आज सकाळी साई बाबांची शिर्डी दुहेरी हत्याकांडाने हादरली. या हत्याकांडाने शिर्डीसह परिसरामध्ये एकच खळबळ उडाली आहे. या मध्ये साई बाबा संस्थानच्या दोन कर्मचाऱ्यांना आपला आजीव गमवावा लागला आहे. एकाच दिवशी तीन वेगवेगळ्या ठिकाणी तिघा जणांवर प्राणघातक हल्ले करण्यात आले. सुभाष घोडे आणि नितीन शेजुळ अशी मृत कर्मचाऱ्यांची नावे आहेत. साई संस्थानचे दोघे कर्मचारी आणि शिर्डीतील एका तरुणावर ड्युटीला येताना प्राणघातक हल्ला करण्यात आला. तीन वेगवेगळ्या ठिकाणी तिघांवर चाकूने वार करण्यात आले. यापैकी साई संस्थानच्या दोघा कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे, तर कृष्णा देहरकर नावाचा तरुण गंभीर जखमी आहे. त्याच्यावर उपचार सुरु आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सुभाष घोडे हे मंदिरातील साईमंदिरातील कर्मचारी ड्युटीवर येत होते. तर नितीन शेजुळ हे सुरक्षा कर्मचारी ड्यूटी संपवून घरी निघाले होते. तर कृष्णा देहरकर हे मुलाला सोडून घरी निघाले होते. त्यांच्यावर अत्यंत प्राणघातक हल्ला झाला.
मोटारसायकलवर असलेल्या दोघांनी चोरीच्या उद्देशानं तिघांना वेगवेगळ्या वेळेत अडवून त्यांच्याकडील रक्कम हिसकावून घेतली. इतक्यावरच न थांबता विकृत मनोवृत्तीतून आरोपींनी या तीनही निरपराध नागरिकांवर चाकूनं असंख्य वार केले. यात दोघांचा जागेवरच मृत्यू झाला. तर एक ग्रामस्थ गंभीर जखमी झाले. या हल्ल्याची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. या प्रकरणी शिर्डी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणांचा पोलीस कसून चौकशी करीत असून गुन्हेगारांना लवकरच जेरबंद करणार असल्याचे पोलीस अधिक्षक राकेश ओला यांनी सांगितले .
मोफत अन्नाछत्रामुळे शिर्डीतील गुन्हेगारी वाढली : मा. खा. सुजय विखे पा.
माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी ‘मोफत अन्नछत्र, मोफत शिर्डी करून ठेवलीय. त्यामुळे शिर्डीत गुन्हेगारी वाढतेय’ असं म्हटलं. “अत्यंत दुर्देवी घटना पहाटे चार वाजता घडली. अशा प्रकारे चाकूने वार करण्यात आले. खरतर अशी घटना या आधी घडलेली नाही. ही अचानक झालेली एक निर्घृण हत्या आहे. चार-पाचच्या सुमारास झाल्यामुळे फार लोक जागे नव्हते. हा निरोप येता-येता सहा-सात वाजले. दोन मृतदेह वेगवेगळ्या स्पॉटवर आढळले. आता प्रवरा मेडिकलमध्ये एका रुग्णावर उपचार सुरु आहेत, तो धोक्यातून बाहेर यावा ही अपेक्षा. अजून मी डॉक्टरशी बोललेलो नाही” असं सुजय विखे पाटील म्हणाले.