नायगाव : तालुक्यातील लालवंडी येथील तरुणाने नांदेड शहरातील महिलेचा शनिवारी सकाळी ६ वाजता खुन केला आणि गावाकडे लालवंडी येथे येवून शेतातील झाडाला गळफास घेवून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली.
सदरील महिलेशी मयत तरुणाचे अनैतिक संबंध होते आणि सदरची महिला या तरुणाची मोठ्या प्रमाणात अर्थिक पिळवणूक करत होती या रागातूनच हत्या करण्यात आली असल्याची माहिती मिळाली आहे.
नायगाव तालुक्यातील लालवंडी येथील तरुण सतीष रामराव आलेल्या वय (२८) हा नांदेड येथील एका खाजगी रक्तपेढी मध्ये कामाला होता. याच ठिकाणी नौकरी करणाऱ्या विवाहित महिलेसोबत त्याचे अनैतिक संबध जुळले.
सदरच्या विवाहित महिलेला दोन मुलीही आहेत मात्र या प्रेम प्रकरणातून काही दिवसापूर्वी दोघे पळूनही गेले होते. परंतु दोन्हीकडच्या कुटुंबीयांनी एक बैठक घेवून प्रकरण मिटवले होते आणि पुन्हा संपर्क न ठेवण्याची ताकीद देण्यात आली होती. मात्र देण्याघेण्याच्या व्यवहारातून टोकाची कटूता निर्माण झाली त्यामुळे सतीषच्या मनात राग होता.
मागील काही दिवसापासून तणावात असलेल्या सतीष आलेवार याने शनिवारी (ता.३१) ला पहाटे चार वाजता लालवंडी येथून चाकू घेवून नांदेडला त्या महिलेच्या घरी गेला. ती सकाळी सकाळी घराच्या समोर काम करत असताना हातात असलेल्या चाकूने वार केला.
आईवर हल्ला होत असल्याने तिची मुलगी धावून आली पण त्या मुलीच्या हातवर वार केला. आरडाओरड होत असल्याने त्या महिलेचा पती धावत आला पण तोपर्यंत सतीष मोटारसायकलवरुन पुन्हा लालवंडीकडे निघाला.
सदरच्या घटनेची शेजाऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली त्यामुळे वजिराबाद पोलीस ठाण्याचे अधिकारी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली सदर महिला गतप्राण झाली होती. खुन करणाऱ्याच्या मोबाईल लोकेशन वरुन त्यांनी पाठलाग सुरु केला. मात्र पोलीस लालवंडी येथे पोहचण्याच्या दहा मिनिटे अगोदर सदरच्या तरुणाने गळफास घेवून आत्महत्या केल्याचे दिसून आले.
या प्रकरणी पाठलाग करणारे वजिराबाद पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक वाटाने यांच्याशी संपर्क साधला असता. खुनाच्या घटनेची माहिती मिळताच आम्ही लालवंडी येथे पोहचलो पण खुन करणारा सतीष आलेवार हा शेतातील झाडाला गळफास घेवून आत्महत्या केली. या प्रकरणाची माहिती नायगाव पोलिसांना समजताच त्यांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला व प्रेत उत्तरीय तपासणीसाठी नायगावच्या ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. रागाच्या भरात सतीष आलेवार याने एका मित्राला फोन करुन मी तिचा खुन केला असून मी ही आत्महत्या करणार आहे असे सांगितले व फोन बंद करुन टाकला नंतर शेतात गळफास घेतल्याच्या अवस्थेत दिसून आला. याघटनेमुळे खळबळ उडाली असून वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे.