अकलूज : माळशिरस तालुक्याच्या पूर्व भागात वाळू माफियांचा हैदोस सुरू आहे. महसूल व पोलीस प्रशासनातील अधिकाऱ्यांची हाताची घडी तोंडावर बोट, अशी अवस्था निर्माण झालेली आहे. माळशिरस तालुक्याच्या पूर्व भागात निरा नदीच्या हद्दीमध्ये संगम, बाभुळगाव, वाफेगाव, वाघोली, कोंढारपट्टा, नेवरे गावच्या हद्दीमध्ये अवैध वाळू उपसा राजरोसपणे सुरू आहे. अवैध वाळू माफिया रात्रंदिवस वाळू व्यवसाय करण्यामध्ये व्यस्त आहेत. महसूल व प्रशासनातील अधिकारी आर्थिक हितसंबंधामुळे मस्त आहेत तर सर्वसामान्य जनता व वाहनधारक त्रस्त आहेत, अशी परिस्थिती माळशिरस तालुक्याच्या पूर्व भागात निर्माण झालेली आहे.
माळशिरस तालुक्याच्या पूर्व भागामध्ये अकलूज पोलीस स्टेशन आहे. याच भागात उपविभागीय तथा प्रांत कार्यालय आहे. उपविभागीय पोलीस उपअधीक्षक यांचे कार्यालय आहे. अनेक गावांमध्ये तलाठी कार्यालय, मंडळ कार्यालय आहेत तरीसुद्धा, वाळूमाफिया राजरोसपणे रात्रंदिवस वाळू काढून दिवसाढवळ्या पोलीस व महसूल कार्यालयाच्या समोरून उरावरून अवैध वाळू वाहतूक करीत आहेत. तरीसुद्धा महसूल व पोलीस प्रशासनातील अधिकारी गप्प का ?, असा सर्वसामान्य जनतेला प्रश्न पडलेला आहे. कोणत्या राजकीय पुढाऱ्याचा वरदहस्त आहे ?, का अधिकाऱ्यांचाच आर्थिक हितसंबंध आहे ?, असाही प्रश्न नागरिकांना पडलेला आहे.
वाळूची अवजड वाहने रस्त्याने ये-जा करीत असल्याने रस्त्याची वाट लावलेली आहे. रस्त्यामध्ये अनेक मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. शालेय विद्यार्थी, दूध उत्पादक, शेतकरी, ज्येष्ठ नागरिक, आजारी रुग्ण यांना रस्त्याच्या समस्यांमुळे अनेक अडचणी निर्माण होत आहेत. महसूल व प्रशासन अधिकारी यांनी अवैध वाळू उपसा बंद करण्यासाठी पावले उचलावीत, अन्यथा महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायत राजमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे माळशिरस तालुक्याच्या दौऱ्यावर असताना पीडित नागरिक भेट घेऊन अवैध वाळू उपसा करणाऱ्या माफीयाचा बंदोबस्त करण्याकरता भेटणार आहेत.