सुरक्षारक्षकाने तिची हत्या केल्याचा आरोप , सुरक्षारक्षकाची रेल्वेखालीआत्महत्या मुंबई : मुंबई मधील मरिन ड्राईव्ह येथील शासकीय वसतिगृहाच्या खोलीत विद्यार्थिनीचा मृतदेह आढळल्याची घटना घडली आहे. या विद्यार्थिनीचा गळा दाबून हत्या केल्याचं स्पष्ट झालं आहे. या प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती मुंबईचे अपर पोलीस आयुक्त डॉ. अभिनव देशमुख यांनी दिली आहे.
मुळची अकोला येथील असलेली विद्यार्थिनी पॉलिटेक्निकच्या दुसऱ्या वर्षाला शिकत होती. ती मरीन ड्राईव्ह येथील वसतिगृहात राहत होती. या तरुणीचे वडील सकाळपासून तिला फोन करत होते. मात्र मुलगी फोन घेत नसल्याने त्यांनी तिच्या मैत्रिणीकडे विचारणा केली. त्यांनी मुलीचा शोध घेतला मात्र ती सापडली नाही. तिच्या खोलीच्या दारालाही कुलूप होतं. त्यामुळे पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली.
पोलीस आल्यानंतर तिचा विवस्त्र अवस्थेतला मृतदेह चौथ्या मजल्यावरील खोलीत सापडला. या वसतिगृहाच्या सुरक्षारक्षकाने तिची हत्या केल्याचा आरोप असून पोलीस अधिक तपास करत आहेत. दरम्यान संध्याकाळी 6 वाजण्याच्या सुमारास या सुरक्षारक्षकाचा मृतदेहही सापडला. सुरक्षारक्षकाने चर्नी रोड ते ग्रँट रोड या स्थानकादरम्यान स्वत:ला रेल्वेखाली झोकून दिल्याची माहिची डॉ. अभिनव देशमुख यांनी दिली.
हा सुरक्षारक्षक गेली 15 वर्षं तिथे काम करत होता. पहाटे तीन वाजता चौथ्या मजल्यावर गेल्याचं तसंच तासाभराने इमारतीतून बाहेर पडल्याचं सीसीटीव्हीत दिसत आहे. पोलीस या प्रकरणी अधिक तपास असून या प्रकरणाची पोलिसांकडून अधिक माहिती गोळा करण्यात येत आहे.
मुंबईचे अपर पोलीस आयुक्त अभिनव देशमुख यांनी पत्रकार परिषदेत या घटनेबद्दल माहिती दिली. ते म्हणाले, “सावित्रीबाई फुले वसतीगृहात एका मुलीच्या खोलीचा दरवाजा लॉक आहे अशी माहिती मिळाली होती. पोलिसांनी त्या ठिकाणी भेट दिली असता त्या ठिकाणी या मुलीचा मृतदेह मिळाला आहे. मुलीचा खून झाला आहे अशा निष्कर्षाप्रत पोलीस आले आहेत. या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही घटना झाल्यानंतर ठाकरे गटाच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. “वसतिगृहातील सुरक्षा नियमांची अंमलबजावणी झाली पाहिजे. 90 दिवसांचा कालावधी गृहित धरून नियमावली तयार करण्यात यावी, विद्यार्थिनीच्या सुरक्षेसाठी नियमावली तयार करण्यात यावी. त्यात संबंधित विद्यार्थिनींच्या पालकांचा समावेश असावा तसंच विद्यार्थिनींच्या तक्रारींना न्याय देऊन सहानुभूतीपूर्वक न्याय द्यायला हवा. या प्रकरणातील सर्व आरोपींना कडक शिक्षा मिळावी.”. असं त्या म्हणाल्या.
भाजपा नेत्या चित्रा वाघसुद्धा आज सावित्रीबाई फुले वसतीगृहाला भेट दिली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या, “मी आत्ता या घटनेची माहिती घेतली. मी इथल्या वॉर्डनशी बोलले आणि काही मुलींशी बोलले. ज्या नराधमाने हे कृत्य केलं तो धोबी होता. त्याच्यावर सगळ्यांचा विश्वास होता म्हणून त्याला वॉचमनचं काम देण्यात आलं. मुलींच्या सुरक्षेचं काम त्याला कसं देण्यात आलं, याची चौकशी करण्यात यावी. ही इमारत पडायला आली आहे. या इमारतीतले सीसीटीव्ही काम करत नाहीत. उच्च तंत्र शिक्षण मंत्री यांच्या खात्याअंतर्गत हे हॉस्टेल येतं. तेही या प्रकरणाची सखोल माहिती घेत आहेत.”