‘आयएमए’ने केली शहरातील डॉक्टरांना सूचना ः ऑनलाईन जाहीरात वाल्यांपासून बाळगा सावधगिरी
नांदेड – प्रतिनिधी (मारोती सवंडकर)
येथे अनेक उच्च दर्जाच्या वैद्यकीय सोयीसुविधा असलेली अनेक रुग्णालये कार्यरत आहेत. दिवसेंदिवस त्यात भरच पडत आहे. त्यामुळे या रुग्णालयातील सोयीसुविधांची ऑनलाईन जाहिरात करण्यासाठी एका कंपनीकडून काही जणांसोबत करार करण्यात आला होता. ऑनलाईन जाहिरातीच्या नावाखाली रुग्णालयांच्या बँक खात्यातून ऑटो डेबिटद्वारे हे पैसे घेण्यात येत होते. त्यामाध्यमातून अनेक रुग्णालयाकडून वारेमाप पैसा उकळण्यात आला. परंतु आता रुग्णालयांनी या कंपनीची सेवा घेण्यास नकार दिल्यानंतरही ऑटो डेबिटद्वारे पैसा उकळणे सुरूच आहे. त्यामुळे डॉक्टर मंडळी वैतागून गेली आहेत.
याविषयी सविस्तर वृत्त असे की, रुग्णालयातील सोई सुविधांच्या आणि डॉक्टरांच्या तपासणीच्या वेळा यासह इतर माहिती अॅपवर आणि सोशल मिडियात ऑनलाईन पद्धीतीने देण्याच्या नावाखाली शहरातील व मराठवाड्यातील अनेक डॉक्टरांसोबत करार करण्यात येत आहेत. या कराराअंतर्गत रुग्णालयाच्या बँक खात्यातून रक्कम अॅटो डेबिट केली जात आहे. मराठवाड्यात अनेक जिल्ह्यात या कंपन्यांचे प्रतिनिधी कार्यरत आहेत. परंतू अनेक रुग्णालयांना इतर जिल्ह्यात जाहिराती करतो असे सांगून धनादेश घेण्यात आले आहेत. परंतू त्यानंतरही ऑटो डेबिटच्या माध्यमातून पैसे घेण्यात येत असल्याच्या तक्रारी काही डॉक्टरांनी आयएमएकडे केल्या होत्या. त्यानंतर आयएमएने डॉक्टरांना याबाबत सतर्क राहण्याच्या सूचना केल्या आहेत.
ऑनलाईन जाहीरात करणाऱ्या एका कंपनीने शहरातील काही रुग्णालयासोबत करार केला होता. सुरुवातीला एक, दोन, पाच वर्षे असा करार करून रुग्णालयाच्या बँक खात्यातून ऑटो डेबिट सुरू करण्यात आले. त्यानंतर हॉस्पिटलची जाहिरात मराठवाड्यातील इतर जिल्ह्यात करतो, एकवेळसच चेक द्या असे सांगितले जाते. परंतु त्यानंतरही ऑटो डेबिट बंद न करता वसुली सुरूच ठेवण्यात येत आहे. त्यातून या कंपनीने रुग्णालयाकडून मोठी रक्कम वसूल केली आहे. या कंपनीचे प्रतिनिधी नांदेडसह शेजारील जिल्ह्यांतही सक्रिय आहेत. त्यामुळे आता ‘आयएमए’ने डॉक्टरांना सतर्क राहण्याच्या सूचना केल्या आहेत.
ऑनलाईन अॅप व सोशल प्लॅटफॉर्मवरील जाहीरातीपासूंन सतर्क राहावे – आयएमए
मराठवाड्यात अनेक जिल्ह्यात ऑनलाईन जाहीरातीव्दारे गंडविण्याचा प्रकार सुरु असून नांदेड, लातूर, हिंगोली आणि परभणी जिल्ह्यांत या कंपनी चे बरेच प्रतिनिधी आणि टिम कार्यरत आहेत. त्यातील काही नावे आमच्याकडे आलेली आहेत. हे मंडळी डॉक्टर लोकांना टार्गेट करीत आहे.
हॉस्पिटल मधील सोयी , सुविधा, फोटो, अपाँन्टमेंट च्या वेळा, पत्ता, संपर्क क्रमांक , टेलिफोन वर अपाँंन्टमेंट अशा बऱ्याच सुविधा अॅप आणि साईट वर देऊ अशी आश्वासने दिली जात असून ५ वर्षाच्या प्लॅन साठी आधी हॉस्पिटल चे करंट अकाऊंट चे ऑटो डेबिट मँन्डेट चालू केले जाते. नंतर ते लोक हॉस्पिटल ची जाहिरात मराठवाड्यातील अजून बाकी जिल्ह्यात करतो आणि एकदाच चेक ने रक्कम द्या असे हे सांगतात आणि जे ऑटो डेबिट बँकेत चालू केलेले आहे ते काही केल्या बंद करीत नाहीत. अशा प्रकारे भरपूर रक्कम वेगवेगळ्या मार्गानी उकळली जाते . या प्रकारापासून सर्व आयएमए सदस्यांनी व वैद्यकीय व्यावसायिक यांनी सावध राहावे असे आवाहन आयएमए चे नांदेड जिल्हाध्यक्ष डॉ. प्रल्हाद कोटकर व सचिव डॉ. राहुल लव्हेकर यांनी केले आहे