नवी दिल्ली : कथित दारू घोटाळ्याप्रकरणी तुरुंगात असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दिल्लीच्या राऊज अव्हेन्यू कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. केजरीवाल यांचे वकील विवेक जैन यांनी जामीन मंजूर झाल्याची खात्री केली आहे.
सध्या अरविंद केजरीवाल दिल्लीच्या तिहार तुरुंगात बंद आहेत. मनी लाँड्रिंग प्रकरणात न्यायालयाने त्यांना अंतरिम जामीन मंजूर केला होता. अंतरिम जामीनाचा कालावधी संपल्यानंतर केजरीवाल 2 जून रोजी तिहार तुरुंगात परत गेले होते. आता सुट्टीच्या काळात कामकाज पाहणाऱ्या न्यायाधीश न्याय बिंदू यांनी केजरीवाल यांना जामीन देण्याचे आदेश दिले आहेत.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना नवीन अबकारी धोरणात (मद्यधोरण) भ्रष्टाचार आणि अनियमिततेच्या आरोपावरून ईडीनं 21 मार्चला अटक केली होती. त्यानंतर त्यांची रवानगी ईडी कोठडीत करण्यात आली होती. त्यानंतर सुप्रीम कोर्टाने 10 मे रोजी निवडणूक प्रचारात सहभागी होण्यासाठी अरविंद केजरीवाल यांना 21 दिवसांचा जामीन मंजूर केला होता. याच जामिनाचा कालावधी संपल्यानंतर अरविंद केजरीवाल 2 जूनला तुरुंगात परतले होते.
मंत्री मनीष सिसोदिया यांच्या नेतृत्वात नोव्हेंबर 2021 मध्ये दिल्लीत नवीन अबकारी धोरण लागू करण्यात आलं होतं. मद्य माफियांवर नियंत्रण मिळण्यासाठी आणि सरकारचा महसूल वाढवणं ही दोन कारणं त्यासाठी सिसोदिया यांनी दिली होती. पण हे धोरण लागू करताना मोठा गैरव्यवहार झाल्याचा आरोप विरोधकांनी केला. दिल्ली सरकारची दिल्लीतील मद्य व्यवसायातील भागीदारी संपवून खाजगी कंपन्यांना फायदा करून देणं हा या धोरणाचा उद्देश असल्याचा आरोप करण्यात आला होता.