अरुणाचल प्रदेशातील तवांग सेक्टरमध्ये भारतीय आणि चिनी सैनिकांमध्ये झटापट झाल्याचं वृत्त आहे. ही घटना नेमकी कधी घडली हे स्पष्ट झालेलं नाही. काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, ९ डिसेंबरला म्हणजेच गेल्या शुक्रवारी हा संघर्ष झाला होता.
भारतातील प्रमुख इंग्रजी वृत्तपत्र ‘द हिंदू’ने भारतीय संरक्षण अधिकार्यांच्या हवाल्याने लिहिलंय की, अरुणाचलमधील तवांग येथे झालेल्या चकमकीत भारतीय सैनिकांपेक्षा चिनी सैनिक जास्त प्रमाणात जखमी झाले आहेत.
१५ जून २०२० रोजी लडाखच्या गलवान खोऱ्यात दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये झालेल्या हिंसक चकमकीनंतर अशी ही पहिलीच घटना आहे.
त्यावेळी २० भारतीय जवानांचा मृत्यू झाला होता, तर अनेक जखमी झाले होते.
‘द ट्रिब्यून’ या वृत्तपत्रानं लिहिलंय की, या भागात भारत आणि चीनचे सैनिक याआधीही आमनेसामने आले आहेत. मात्र, या प्रकरणी भारत सरकारकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. पूर्व लडाखमध्ये ऑगस्ट 2020 नंतर दोन्ही देशांच्या लष्करांमध्ये चकमक होण्याची ही पहिलीच घटना आहे.
चीननेही याबाबत अद्याप कोणतेही वक्तव्य जारी केलेलं नाहीये.