संपूर्ण देशात उन्हाळ्यात जाणवणार उष्णतेच्या लाटा …
मुंबई : तीन वर्ष दडी मारल्यावर एल निनो 2023 मध्ये पुन्हा प्रकटला आणि तेव्हापासून जगभरात अनेक ठिकाणी तापमानानं उच्चांक गाठले. पण 2024 या वर्षाच्या सुरुवातीला मंदावल्याचं जागतिक हवामान संघटनेच्या तज्ज्ञांनी जाहीर केलं होतं. भारतीय हवामान विभागानंही त्याला दुजोरा दिला आहे. एल निनो सध्या मध्यम स्वरुपात असून, तो येत्या काळात कमकवूत होत जाईल आणि मान्सूनच्या मध्यावर ला निना चा प्रभाव जाणवू लागेल, अशी माहिती हवामान विभागानं दिली आहे.
एल निनो सारखाच हिंद महासागरातला इंडियन ओशन डायपोल अर्थात IOD हा प्रवाहही मान्सूनवर परिणाम करू शकतो. सध्या IOD सम स्थितीत (न्यूट्रल) असून मान्सून सुरू झाल्यावर तो पॉझिटिव्ह होईल असं हवामान विभागानं म्हटलं आहे. या दोन्ही भाकितांचा अर्थ असा आहे की भारतात मान्सून कालावधीत यंदा चांगला पाऊस पडू शकतो. काही दिवसांपूर्वीच आशिया पॅसिफिक देशांची संघटना APEC च्या हवामान विभागानंही असाच अंदाज वर्तवला होता.
संपूर्ण देशात उन्हाळ्यात जाणवणार उष्णतेच्या लाटा … यंदा फेब्रुवारी आणि मार्च महिन्यांत भारतात उष्णतेच्या लाटा नोंदवल्या गेल्या नाहीत. पण या काळात महाराष्ट्रात बहुतांश भागांमध्ये कमाल तापमान नेहमीपेक्षा जास्त नोंदवलं गेलं. दक्षिण भारतातही या दोन्ही महिन्यांमध्ये तर मध्य भारतात मार्चमध्ये हीच स्थिती होती.या उकाड्यातून मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाची इतक्यात सुटका होण्याचीही चिन्हं नाहीत. राज्याच्या या अंतर्गत भागांमध्ये एप्रिल महिन्यांत उष्णतेच्या लाटा येण्याची शक्यता असल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे.
(भारतीय हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार समुद्र किनाऱ्याजवळच्या प्रदेशात सलग दोन दिवस 37 अंश सेल्सियसपेक्षा जास्त कमाल तापमान नोंदवलं गेलं किंवा सलग दोन दिवस तापमानात नेहमीपेक्षा 4.5 अंशांहून अधिक वाढ झाली, तर उष्णतेची लाट आल्याचं मानलं जातं.)