नवी दिल्ली : देशातील काही निवृत्त न्यायमूर्ती भारतविरोधी टोळीतील आहेत, असा गंभीर आरोप विधिमंत्री किरेन रिजिजू यांनी शनिवारी एका कार्यक्रमात केला.
“कार्यकर्ते झालेले हे निवृत्त न्यायमूर्ती न्यायपालिकेला सरकारविरोधात उभे करण्यासाठी प्रयत्नशील आहेत, त्यांना त्याची किंमत मोजावी लागेल,” असा इशाराही रिजिजू यांनी दिला. तसेच, निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीसाठी समिती स्थापन करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनाही त्यांनी विरोध दर्शवला.
“कायदेमंडळ आणि न्यायपालिका यांच्यासाठी राज्यघटनेने लक्ष्मणरेषा आखून दिली आहे आणि जर न्यायमूर्ती प्रशासकीय नियुक्त्या करण्यात सहभागी झाले तर न्यायालयाचे कामकाज कोण करेल,” असा प्रश्न रिजिजू यांनी उपस्थित केला.