कुवेतमध्ये इमारतीला लागलेल्या आगीत अनेक भारतीयांचा मृत्यू,

0

कुवेत : कुवेतच्या मंगाफ शहरातील एका रहिवासी इमारतीला लागलेल्या आगीमुळे किमान 49 लोकांचे प्राण गेले आहेत. कुवेतच्या गृहमंत्र्यांनी ही माहिती दिली आहे. ही आग एका बहुमजली इमारतीला बुधवारी सकाळी लागली होती. त्यानंतर इमारतीच्या खिडक्यांमधून धुराचे लोट दिसू लागले. या इमारतीत बहुतांश लोक हे स्थलांतरित मजूर आहेत. या घटनेत 50 लोक जखमी झाल्याचं सांगण्यात येत आहे.

घटनेच्यावेळेस इमारतीत 160 मजूर होते. ते सर्व एकाच कंपनीत काम करतात. भारतीय राजदुतांनीही या घटनास्थळाला भेट दिली. भारतीय दुतावासाने आगप्रभावित कुटुंबांच्या मदतीसाठी एक हेल्पलाईन नंबरही सुरू केला आहे. (+965-65505246) भारताच्या राजदुतांनी रुग्णालयात जाऊन जखमींचीही भेट घेतली. कुवेतचे गृहमंत्री फहद युसुफ अल सबाह यांनी घटनास्थळाला भेट दिली आणि पत्रकारांशी चर्चा करताना, घरमालकांचा हावरटपणा यासाठी कारणीभूत आहे असं सांगितलं.

या इमारतीत क्षमतेपेक्षा जास्त लोक राहात होते असं कुवेती माध्यमांनी सांगितलं. संपत्ती कायद्याचं उल्लंघन इथं झालं आहे का हे पाहिलं जाईल असं गृहमंत्र्यांनी सांगितलं आहे. कुवेतमध्ये दोन-तृतियांश लोकसंख्या स्थलांतरित मजुरांचीच आहे. हा देश बाहेरुन आलेल्या मजुरांवर अवलंबून आहे. मानवाधिकार संघटनांनी कुवैतमधील स्थलांतरित लोकांच्या जीवनस्तराबद्दल अनेकदा काळजी व्यक्त केलेली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here