नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना कथित दारू घोटाळ्यात अटक केल्यानंतर या प्रकरणात सरकारी साक्षीदार झालेले हैदराबादचे व्यापारी पी. सरथचंद्र रेड्डी पुन्हा एकदा चर्चेत आलेत. केजरीवालांविरोधात साक्ष देणाऱ्याच्या रेड्डी यांच्या कंपनीने भाजपला कोट्यवधीं रुपयांचे इलेक्टोरल बाँड खरेदी केल्याचे स्पष्ट झाले आहे. याबाबत आपने पत्रक्र परिषद घेत भाजप आणि ईडी यांना आता सवाल केला आहे. आणि याबाबत अधिक चौकशीची मागणीही केली आहे. रेड्डी यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) 10 नोव्हेंबर 2022 रोजी कथित दिल्ली दारू घोटाळा प्रकरणात मनी लाँड्रिंगच्या आरोपाखाली अटक केली होती.
ईडीच्या म्हणण्यानुसार, रेड्डी हे “साऊथ ग्रुप” चा भाग होते. त्यांनी आम आदमी पार्टीला (आप) 100 कोटी रुपये दिले असून पक्षाने याचा वापर गोवा निवडणुकीत केला होता.
3 एप्रिल 2021 रोजी कंपनीने 2.5 कोटी रुपयांचे रोखे खरेदी केले. हे सर्व रोखे तेलुगु देसम पक्षाला (टीडीपी) देण्यात आले. 5 जानेवारी 2022 रोजी अरबिंदो फार्माने 3 कोटी रुपयांचे रोखे खरेदी केले. हे सर्व रोखे भारतीय जनता पक्षाला देण्यात आले. 8 एप्रिल 2022 रोजी कंपनीने 15 कोटी रुपयांचे रोखे खरेदी केले. हे सर्व रोखे तेलंगणाच्या भारत राष्ट्र समिती पक्षाला देण्यात आले. 7 जुलै 2022 रोजी कंपनीने 1.5 कोटी रुपयांचे रोखे खरेदी केले. हे सर्व रोखे भाजपला देण्यात आले.
भाजपला किती कोटींचे रोखे देण्यात आले?
पी सरथचंद्र रेड्डी यांच्या अटकेपूर्वी अरबिंदो फार्माने एकूण 22 कोटी रुपयांचे निवडणूक रोखे खरेदी केले होते. त्यापैकी 4.5 कोटी रुपयांचे रोखे भाजपला देण्यात आले. त्यानंतर 10 नोव्हेंबर 2022 रोजी ईडीने त्यांना अटक केली. या अटकेनंतर पाच दिवसांनी म्हणजेच 15 नोव्हेंबर 2022 रोजी अरबिंदो फार्माने 5 कोटी रुपयांचे रोखे खरेदी केले आणि हे सर्व रोखे भाजपला देण्यात आले. भाजपने 21 नोव्हेंबर 2022 रोजी हे रोखे वठवले.