खुशखबर …यंदा देशभरात सरासरीपेक्षा जास्त पावसाचा हवामान खात्याचा अंदाज

0

मुंबई : भारतीय हवामान विभागानं सोमवारी दीर्घकालीन हवामान अंदाज वर्तवला. त्यानुसार यंदा संपूर्ण देशभरात नैऋत्य मान्सूनच्या काळात सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सरासरीपेक्षा जास्त म्हणजे 106 टक्के पाऊस पडण्याची शक्यता असल्याची माहिती हवामान विभागाचे मुख्य संचालक डॉ. मृत्युंजय महापात्र यांनी पत्रकार परिषदेत दिली.

एल निनो’ आणि ‘ला निना’मुळं निर्माण होणाऱ्या परिस्थितीचा अंदाज घेऊन हवामान विभागानं हे दीर्घकालीन अंदाज जाहीर केले आहेत. एल निनो जाऊन ला निना येत असल्यानं त्याचा सकारात्मक परिणाम होणार असल्याचं ते म्हणाले.

हवामान विभागाकडं असलेल्या जवळपास 70 वर्षांच्या आकडेवारीचा सविस्तरपणे अभ्यास करून या निष्कर्षापर्यंत पोहोचल्याचंही महापात्र यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. त्यानुसार देशातील बहुतांश भागात म्हणजे जवळपास 75 टक्क्यांपेक्षा अधिक भागामध्ये चांगल्या पावसाची शक्यता आहे. उत्तर, ईशान्य आणि पूर्वेतील काही राज्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता आहे.

डॉ. मृत्युंजय महापात्र यांनी दिलेल्या माहितीनुसार देशभरात सरासरीपेक्षा जास्त म्हणजे 106 टक्के इतका पाऊस पडण्याची शक्यता आहे. जून ते सप्टेंबर या दरम्यानच्या नैऋत्य मान्सून काळातील पावसाचा हा अंदाज आहे. हवामान खात्याच्या अंदाजाच्या अचूकतेबाबत बोलताना, वर्तवलेल्या अंदाजापेक्षा 5 टक्के कमी किंवा जास्त प्रमाणात पाऊस होऊ शकतो, असंही ते म्हणाले. तसं असलं तरी सरासरीपेक्षा पावसाचं प्रमाण जास्तच राहील.

आजवरच्या पावसाच्या आकडेवारीचा अभ्यास करून 5 जून ते 30 सप्टेंबरदरम्यान सरासरी 87 सेंमी मीटर पाऊस होत असतो, हा आकडा समोर आलाय. हे 87 सेंटीमीटर प्रमाण म्हणजे देशातील सरासरी पाऊस. जेव्हा या 87 टक्क्यांच्या 96 ते 104 टक्के पाऊस पडत असतो, त्याला सरासरी पाऊस म्हणतात. त्यापेक्षा जास्त म्हणजे सरासरीपेक्षा जास्त पाऊस असतो. तर 90 टक्क्यांपेक्षा कमी म्हणजे सरासरीपेक्षा कमी पाऊस असतो, असंही मोहोपात्रा म्हणाले. म्हणजेच यावर्षी देशात 87 सेंटीमीटरच्या 106 टक्के पाऊस पडू शकतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here