सातारा : उत्तरेकडून थंड वारे वाहत असल्याने जिल्ह्यात थंडीच्या प्रमाणात वाढ होऊ लागली आहे. शनिवारी महाबळेश्वरात ११.७ तर सातारा शहरात १२.६ अंश किमान तापमानाची नोंद झाली. त्यातच थंड वाऱ्यामुळे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही चांगला गारठा पडल्याने जनजीवनावर परिणाम झाला आहे.
नोव्हेंबर महिन्याच्या मध्यानंतर जिल्ह्यात कडाक्याची थंडी पडली होती. त्यावेळी महाबळेश्वरचा पारा ११ अंशाच्या खाली गेला होता. तसेच सातारा शहरातही १२ अंशाखाली किमान तापमान गेले होते. हे मागील काही वर्षांतील नीच्चांकी तापमान ठरले होते. तसेच या थंडीमुळे ग्रामीण भाग तर पूर्णतः गारठला होता. जनजीवन विस्कळीत झाले होते. शेतकऱ्यांना तर अनेक समस्यांशी तोंड द्यावे लागले.
पण, डिसेंबर उजाडल्यानंतर थंडी गायबच झाली होती. आठ दिवस पारा वाढला होता. यामुळे २० अंशावर किमान तापमान गेले होते. मात्र, मागील चार दिवसांपासून पुन्हा थंडीच्या तीव्रतेत वाढ होत चालली आहे.
सातारा शहराबरोबरच महाबळेश्वरचा पाराही खालावला आहे. साताऱ्याच्या किमान तापमानात एकाच दिवसात तीन अंशांनी उतार आलेला आहे. साताऱ्यात १२.६ तर महाबळेश्वरला ११.७ अंशाची नोंद झाली. त्यामुळे महाबळेश्वर आणि तालुक्यातही थंडीचा कडाका कायम असल्याचे दिसून येत आहे. त्याचबरोबर जिल्ह्यातही थंडी वाढली आहे. बहुतांशी भागात किमान तापमान १३ अंशाच्या खालीच आहे.
यामुळे सायंकाळी पाचनंतर थंडीला सुरुवात होत आहे तर पहाटेच्या सुमारास कडाक्याची थंडी पडत आहे. त्यामुळे सकाळी १० वाजले तरी अंगातून थंडी जात नाही, अशी स्थिती आहे. तरीही अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना पिकांना पाणी देण्यासाठी जावे लागत आहे. थंडी वाढल्याने बाजारपेठेत रात्रीच्या सुमारास होणारी गर्दी कमी झाली आहे.