पुसेगाव /प्रतिनिधी
भटक्या विमुक्त जमाती संघटनेच्या वतीने व सेंटर फॉर युथ डेव्हलपमेंट अँड ऍक्टिव्हिटी (CYDA) या एनजीओच्या मदतीने महाराष्ट्रातील तरुण मुला-मुलींचे उद्योजकता प्रशिक्षण शिबिर सातारा जकातवाडी येथे आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती भटक्या विमुक्त संघटनेचे अध्यक्ष मा लक्ष्मणराव माने यांनी दिली आहे.
या शिबिरामध्ये या तरुण मुला-मुलींना विविध व्यवसायांचे मार्गदर्शन केले जाईल. ज्यांना तंत्र कुशल व्यवसायात जायचे आहे किंवा नोकरीमध्ये जायचे आहे. अशा मुलांना तीन महिने, सहा महिने किंवा एक वर्ष असे छोटे छोटे तांत्रिक डिप्लोमाच्या माध्यमातून तंत्र कुशल शिक्षण दिले जाईल. त्यानंतर या मुलांना त्या त्या कंपन्यांमध्ये नोकरी मिळवून देणे किंवा प्रशिक्षण काळात मिळालेल्या अनुभवातून स्वतंत्र व्यवसाय उभा करण्यासाठी मदत व मार्गदर्शन केले जाणार आहे.
याच बरोबर परंपरागत आलेले व्यवसाय त्यातील कुशलता व सामुदायिक करण्याचे व्यवसाय उदा. महिला बचत गट, घरोघरी चालणारे छोटे छोटे उद्योग, उत्पादित मालाचे मार्केटिंग, आर्थिक बचत, ग्रामीण भागातील शेती आधारित व शेती उत्पादित मालावर प्रक्रिया करणारे उद्योग.
या सर्वांसाठी लागणारे भांडवल, भांडवल देणाऱ्या बँका, पतसंस्था, शासकीय महामंडळे, शासकीय योजना या सर्वांची माहिती व प्रशिक्षण या चार दिवसांच्या शिबिरात दिले जाणार आहे. यासाठी तज्ञ मार्गदर्शक, महामंडळाचे अधिकारी, बँकांचे अधिकारी, शासकीय योजनांचे प्रवर्तक यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.
*निवासी शिबिराचा कालावधी*-
दिनांक २ डिसेंबर २०२४ सकाळी ११. वा. ते ५ डिसेंबर २०२४ सायंकाळी ५ वा. पर्यंत असेल.
*स्थळ*- शारदाश्रम, जकातवाडी, सातारा.
सहभागी होणाऱ्या शिबिरार्थींच्या चार दिवसाच्या निवासाची, जेवण व नाष्टा याची व्यवस्था करण्यात येणार असल्याची माहिती भटक्या विमुक्त संघटनेचे अध्यक्ष लक्ष्मणराव माने यांनी दिली असून अधिक माहितीसाठी कार्यालयीन व्यवस्थापन प्रवीण खुंटे मोबाईल नंबर 97 30 26 21 19 यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.