एकाही गावाला पाणी टंचाई भासू देणार नाही ; आ. महेश शिंदे यांची घोषणा

0

कोरेगाव : कोरेगाव विधानसभा मतदारसंघात समाविष्ठ असलेल्या एकाही गावाला पाणी टंचाई भासू देणार नाही. राज्य सरकारच्या माध्यमातून प्रभावी उपाययोजना केली जाणार असून जेथे जेथे आवश्यक आहे, तेथे नव्याने कूपनलिका घेतल्या जातील.
पाणीपुरवठा योजनांना अखंडीत वीजपुरवठा व्हावा, यासाठी नवीन ट्रान्सफॉर्मर्स बसविले जातील, अशी घोषणा आ. महेश शिंदे यांनी केली.

कोरेगाव औद्योगिक वसाहतीतील प्रियांका मल्टीपर्पज हॉलमध्ये शुक्रवारी दुपारी टंचाई आढावा बैठक आयोजित केली होती. यावेळी अध्यक्षस्थानावरुन ते बोलत होते. जिल्हा बँकेचे संचालक सुनील खत्री, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहूल प्रकाश बर्गे, नगराध्यक्ष प्रशांत बर्गे, माजी नगरसेवक महेश बर्गे, प्रांताधिकारी अभिजित नाईक, तहसीलदार डॉ. संगमेश कोडे, गटविकास अधिकारी किशोर माने, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता उत्तमराव आंधळे, महावितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता दिनेश कडाळे, नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी विजया घाडगे आदी उपस्थित होते.

-गावपातळीवर जनजागृती करावी
आ. शिंदे म्हणाले, दुष्काळी परिस्थितीमुळे पाण्याची उपलब्धता कमी आहे, त्यामुळे गावपातळीवर त्याबाबत जनजागृती करण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घ्यावा. ज्या गावात नवीन वीज वाहिनी व ट्रान्सफॉर्मर्स बसवायचे आहेत, त्या गावांसाठी मी महावितरण कंपनीचे प्रभारी अधीक्षक अभियंता महेश बारटक्के यांना सूचना दिल्या आहेत. लवकरच सातारच्या मंडल कार्यालयात विशेष बैठक घेऊन विजेचे प्रश्‍न सोडविले जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले. कोरेगाव शहरात सध्या तीव्र पाणी टंचाई भासत आहे, प्रशासनाने तातडीने टँकरची व्यवस्था करावी, जुन्या कूपनलिकांची पंचायत समिती प्रशासनाने तात्काळ दुरुस्ती करुन द्यावी, नवीन कूपनलिका घेण्यासाठी आणि विहीर अधिग्रहण आदी विषयावर तातडीने पावले उचलावीत, अशा सूचना आ. शिंदे यांनी प्रशासकीय अधिकार्‍यांना दिल्या.

– बैठक घेऊन मार्ग काढण्याच्या सूचना
यावेळी आ. शिंदे यांनी गावनिहाय सरपंच, उपसरपंच व ग्रामसेवकांकडून पाणी टंचाईचा आढावा घेतला. तातडीने करावयाच्या उपाययोजनांबाबत जागेवरच संबंधित प्रशासकीय अधिकार्‍यांना निर्देश दिले. जेथे जेथे अडचण आहे, तेथे तेथे बैठक घेऊन मार्ग काढण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. बैठकीच्या यशस्वीतेसाठी प्रांताधिकारी कार्यालयातील अव्वल कारकून रणजित जाधव, मंडल अधिकारी शिवाजीराव पिसाळ, तलाठी किरण पवार, समाजसेवी कर्मचारी संतोष बर्गे, कोतवाल सुरज सरगडे यांनी परिश्रम घेतले.

– पाणी टंचाई निवारणासाठी हाय व्होल्टेज व्हॉट्सअप ग्रुप
पाणी टंचाईचा आढावा घेत असताना माजी नगरसेवक महेश बर्गे यांनी अडचणींना पाढाच वाचला. पंचायत समितीकडे पैसे भरुन देखील कूपनलिका दुरुस्त करुन दिल्या जात नाहीत, कठापूर पंपहाऊस येथे विजेचा सातत्याने खेळखंडोबा होतो, असे निदर्शनास आणून दिले. तसेच नागरिक संतप्त होत असून, नगरपंचायत प्रशासनाला काम करताना अडचणी निर्माण होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावर आ. महेश शिंदे यांनी तत्काळ शहरातील पाणी टंचाई निवारणासाठी तत्काळ हाय व्होल्टेज व्हॉट्सअप ग्रुप तयार करण्याच्या सूचना दिल्या. जिल्हाधिकार्‍यांपासून ते संबंधित अधिकारी ते पाणीपुरवठा विभागाचा शेवटच्या कर्मचार्‍याला त्यात सामील करुन घ्या, मला देखील त्यामध्ये समाविष्ठ करा आणि पाणीपुरवठ्यात येत असलेल्या अडचणी त्यावर मांडा, तत्काळ निर्णय होऊन समस्येचे निराकारण होईल. कोणत्याही परिस्थितीत शहराला पाणी कमी पडू द्यायचे नाही, असे स्पष्ट निर्देश आ. महेश शिंदे यांनी संबंधित अधिकार्‍यांना दिले. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here