प्रतापगङ प्रतिनिधी:
छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाची साक्ष देणाऱ्या ऐतिहासिक किल्ले प्रतापगडाचा जागतिक वारसा स्थळांमध्ये समावेश होत असल्याच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यातील स्वच्छता पंधरवड्याचा शुभारंभ आज किल्ले प्रतापगडावर करण्यात आला. याप्रसंगी प्रतापगडावर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
दि.19 सप्टेंबर,2024 रोजी ‘स्वच्छता ही सेवा’ या कार्यक्रमातंर्गत स्वच्छता पंधरवडा जिल्हास्तरीय प्रारंभ व प्रतापगड किल्ल्याचे युनेस्कोच्या वारसा स्थळाच्या नामांकनाच्या अनुषंगाने आयोजित विद्यार्थी वक्तृत्व, निबंध, चित्रकला व किल्ले निर्मिती स्पर्धांचा प्रारंभ सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सन्माननीय याशनी नागराजन मॅडम,उपमुख्य कार्यकारी अधिकारी मा.क्रांती बोराटे मॅडम व गटविकास अधिकारी मा.अरुण मरभळ साहेब व उपस्थित मान्यवर, खातेप्रमुख, अधिकारी- कर्मचारी, ग्रामस्थ तसेच शिक्षक-विद्यार्थी यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
सुरुवातीस पारसोंड व शिरवली केंद्रातील सर्व जिल्हा परिषद व माध्यमिक शाळांचे विद्यार्थी, शिक्षक, ग्रामस्थ, विविध विभागांचे शासकीय कर्मचारी यांना गडाच्या पायथ्याशी स्वच्छता शपथ देण्यात आली.मुख्य कार्यकारी अधिकारी मा.याशनी नागराजन यांनी विद्यार्थ्यांना स्वच्छता व प्रतापगड किल्ल्याचे महत्व याविषयी मार्गदर्शन केले.वेगवेगळ्या १५ टिमच्या माध्यमातूनगडावरील विविध ठिकाणांची स्वच्छता करण्यात आली.
दुपारच्या सत्रात सर्व विद्यार्थ्यांसाठी विविध गटांमध्ये प्रतापगड – ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा या विषयावर वक्तृत्व, निबंध व चित्रकला स्पर्धा पार पडल्या.यानंतर विद्यार्थी गटांमध्ये किल्ले प्रतिकृती बनवण्याची अनोखी स्पर्धा पार पडली.महाराष्ट्रातील विविध ऐतिहासिक किल्ले बनवताना विद्यार्थ्यांचा उत्साह वाखाणण्याजोगा होता.सर्वच स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.दिवसभर गडावर सुरू असलेल्या वैविध्यपूर्ण उपक्रमांमुळे गडाला उत्सवाचे स्वरूप प्राप्त झाले.पंचायत समिती महाबळेश्वरचे गटविकास अधिकारी श्री.अरुण मरभळ यांचे मार्गदर्शन व विविध खातेप्रमुख विशेषतः गटशिक्षणाधिकारी आनंद पळसे यांचे सूक्ष्म व नेटके नियोजन यामुळे सदरचा उपक्रम यशस्वी झाला.