सातारा : क्राईम ब्रँचमध्ये असल्याचे सांगून डॉ. नारायण विष्णू जोग (वय ६७, रा. शेंद्रे, ता. सातारा) यांना तिघांनी १ लाख ६० हजारांचा गंडा घातला. ही घटना दि. ११ रोजी सकाळी साडेआठ वाजता शेंद्रे, ता.
सातारा येथे घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, डॉ. नारायण जोग हे सकाळी साडेआठच्या सुमारास दुचाकीवरून निघाले होते. त्यावेळी त्यांच्या घरापासून जवळच एक तरुण तेथे आला. मी क्राईम ब्रॅंचमध्ये आहे. इकडील परिसरात गांजा, दारू, ब्राऊन शुगर, ड्रग्ज असे अवैध धंदे सुरू आहेत. त्यामुळे तुम्ही सोन्याचे दागिने घालून फिरू नका. तुमची फसवणूक होऊ शकते. तुम्ही तुमचे सोन्याचे दागिने काढून माझ्याकडे द्या. मी तुमचे दागिने रुमालात गुंडाळून तुमच्या खिशात ठेवतो, असे सांगितले.
त्यानंतर डॉ. जोग यांनी साडेतीन तोळ्यांची सोन्याची अंगठी, गळ्यातील चेन तसेच पैशाचे पाकिट काढून दिले. हा ऐवज रुमालात बांधून डॉ. जोग यांच्या पॅन्टच्या खिशात ठेवून निघून गेला. त्याच्यासोबत अन्य दोघे जण होते. ते सद्धा लगोलग निघून गेले. काही वेळानंतर डॉ. जाेग यांनी रुमाल उघडून पाहिला असता त्यामध्ये काहीच नव्हते. आपली फसवणूक झाल्याचे समजताच त्यांनी सातारा तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. हवालदार निकम हे अधिक तपास करीत आहेत.