खटाव : खटाव परिसरात शनिवारी (दि. 30) सायंकाळी वळिवाच्या पावसाने विजांच्या कडकडाटासह हजेरी लावली. Rainfall in Khatav area पावसाबरोबर आलेल्या सोसाट्याच्या वार्यामुळे काही घरांचे पत्रे उडून गेले आणि काही वृक्ष उन्मळून पडले.
आंब्याच्या झाडांवरील कैर्यांचा सडा पडला. पाऊस आणि वार्यामुळे नागरिकांचे हजारो रुपयांचे नुकसान झाले.
गेल्या काही दिवसांपासून खटावच्या आजूबाजूला पाऊस पडत होता. मात्र, खटावला पाऊस हुलकावणी देत होता. गेल्या दोन दिवसांपासून कमालीचा उकाडा जाणवत होता. शनिवारी दुपारी हवामानात कमालीचे उष्ण आणखी वाढला होता. मात्र, सायंकाळी अचानक हवमाना बदलून, ६ वाजता पावसाला सुरुवात झाली. ढगांचा गडगडाट आणि विजांचा कडकडाट सुरू होता.
मात्र, पाऊस कमी आणि वारा जास्त होता. सोसाट्याच्या वार्यामुळे परिसरातील अनेक वृक्षाच्या फांद्या तुटून पडल्या, तर काही वृक्ष उन्मळून रस्त्यावर पडले. त्यामुळे काही वेळ जनजीवन विस्कळीत झाले होते. वार्यामुळे खटावच्या शास्त्रीयनगरमध्ये अब्दुल हमीद सय्यद आणि दिलीप खरात यांच्या घरांचे पत्रे उडून जाऊन, त्यांचे संसार उघड्यावर पडले.
संतोष बागल यांची पत्र्याची शेड उडून नुकसान झाले. सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही. काही ठिकाणी वीजवाहक तारांसह खांब कोसळल्याने वीजपुरवठा रात्रभर खंडित ठेवण्यात आला होता.
शासकीय कर्मचारी व प्रतिष्ठित नागरिकांनी रविवारी सकाळी परिसरात भेट देऊन, नुकसानग्रस्त कुटुंबांना दिलासा दिला. त्यामुळे जनजीवन मात्र पुरते विस्कळीत झाले.
बहुतांश शेतकरी मशागतीकडे वळला आहे; परंतु काही मागास पिके व कांद्यासारखी नगदी पिके अद्याप शेतातच आहेत. जनावरांसाठी लागणारी वैरणसुद्धा काही शेतकर्यांनी शेतात ठेवली होती. अचानक आलेल्या पावसाने शेतकर्यांची धांदल उडाली.
हा पाऊस मशागतीसाठी आणि आले व ऊस या पिकांसाठी पूरक आहे. मात्र, कांदा, भाज्या, फळबागांसाठी हानिकारक असल्याचे शेतकर्यांनी सांगितले. मात्र, हवेत काही वेळ गारवा पसरल्याने उकाड्याने त्रस्त नागरिकांना काही अंशी दिलासा मिळाला.