नागठाणे : गेले तीन दिवस पहाटे चार ते साडेचार वाजल्यापासुन सुर्योदयापर्यंत खोजेवाडी (ता. सातारा) व परिसरातील अनेक गाव, शिवारं धुक्याच्या दाट दुलईत हरवुन जात असल्याचे चित्र आहे. मात्र, सलग तीन दिवस पडणाऱ्या दाट धुक्यामुळे पिकावर कीड रोगांचा प्रादुर्भाव वाढणार असल्याने शेतकरीवर्ग धास्तावला आहे.
यावर्षी पाऊसमान भरपूर झाले. पावसाळा बऱ्यापैकी लांबलाही होता. त्यानंतर आता कुठे थंडीची चाहूल लागली होती. मध्यंतरी वातावरणात बदल होऊन पुन्हा पाऊस पडला. सध्या थंडीचे पुन्हा आगमन झाले आहे. परंतु, गेले तीन दिवस पहाटे पासुन सलग धुके पडत आहे. दाट धुक्यातून शेतशिवारं दिसेनाशी होत आहेत. दि. २३ रोजी तर सकाळी दहा वाजेपर्यंत सुर्यदर्शनच झाले नाही. अशा प्रकारे पडणाऱ्या धुक्यामुळे रब्बी हंगामातील गहू, ज्वारी, हरभरा, कांदा, लसुण व फळभाजी पिकांवर कीड रोगांचा प्रादुर्भाव होण्याच्या शक्यता आहे.
शेतकऱ्यांनी पिकांची काळजी घ्यावी
वातावरणातील बदल पाहता सध्या पडणारे धुके शेतीसाठी नुकसानकारक आहे. रब्बी हंगामातील ज्वारीवर चिकटा, गहू पिकावर तांबेरा, कांदा लसणावर करपा व टोमॅटो, पावटा अशा फळभाज्यांवर कीडींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो. या साठी आता शेतकऱ्यांनी जागृत राहिलं पाहिजे. धुके पडण्याचं प्रमाण कमी होताच तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली योग्य त्या फवारण्या करून पिके वाचावावीत, असे आवाहन कृषी सहाय्यक अंकुश सोनावले यांनी केले आहे.