अनिल वीर सातारा :- श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज (थोरले) नगरवाचनालय सातारा वाचक व्यासपीठ उपक्रमांतर्गत येथील लेखक पद्माकर पाठकजी यांच्या ‘रंग प्रेमाचे बदलत्या काळाचे ‘ या कथासंग्रहाचे प्रकाशन ज्येष्ठ साहित्यिक डॉ. राजेंद्र माने आणि समीक्षक लेखक मधू नेने यांच्या हस्ते पार पडले . यावेळी नगरवाचनालयाचे अध्यक्ष अजित कुबेर व विश्वस्त समितीचे अध्यक्ष अनंतराव जोशी मंचावर उपस्थित होते .
यावेळी बोलताना डॉक्टर राजेंद्र माने म्हणाले, रंग प्रेमाचे बदलत्या काळाचे या कथासंग्रहातील पद्माकर पाठक यांच्या कथा वाचकाच्या भावविश्वाशी समांतर जाणाऱ्या आहेत .त्यामुळे त्या वाचकाला बांधून ठेवतात . प्रेम भावने मागची संवेदनशील मनोवस्था बऱ्याचशा कथांमधून उत्कटपणे सामोरी येते .त्यामुळे या कथा माणसांच्या भावभावनेला साद घालतात. त्याच सोबत कथेतील पात्रांच्या मनोवस्थेचा अचूक वेध घेतात .
लेखकाच्या मनाची संवेदनशीलता ,भाषेचा सोपेपणा आणि त्याच सोबत यात येणारी चित्रपट गीतातील स्फुटं या सर्वांमुळे कथांची आशयगर्भता वाढली आहे .यातल्या कथा जगण्याला एक सकारात्मक जाणीव देतात आणि हे या कथांचं यश आहे. मधू नेने यांनी यातल्या कथा प्रेम या विषयाशी संलग्न आहेत . परानुभूती मधून कथेतील पात्रांचे भावभावना यात उलगडून दाखवल्या आहेत . पाठकजींचे नाव सिने समीक्षक म्हणून प्रसिद्ध असले तरी या कथा त्यांच्यातला कथालेखक यशस्वीपणे व्यक्त करणाऱ्या आहेत असे सांगून काही कथांचे उतारे त्यांनी वाचून दाखवले .
यावेळी प्रास्तविक व्यक्त करताना अनंतराव जोशी यांनी पाठकजी यांच्या इतर पुस्तकांचा उल्लेख करून गेली बरेच वर्षे ते समर्पितपणे लेखन करत आहेत. असे उद्गार काढले .पद्माकर पाठक यांनी मनोगतामध्ये या कथासंग्रहातील कथा बरेच वर्षे ते लिहीत असून त्या इतर दर्जेदार मासिकामध्ये प्रकाशित झालेल्या आहेत.असे सांगितले .योगायोग म्हणजे आजच ‘ सिने डायरी ‘ या पुस्तकाचे इंग्रजी भाषांतर प्रकाशित झाले असून ते पुस्तक वाचकांना ऑनलाइन खरेदी करता येणार आहे. ही शुभ वार्ताही त्यांनी सांगितली .
जयदीप पाठक यांनी मधुश्री प्रकाशनचे प्रकाशक पराग लोणकर यांनी पाठवलेले प्रकाशकीय मनोगत प्रारंभी वाचून दाखवले . वैदेही कुलकर्णी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले . जयदीप पाठक यांनी आभार मानले .सदरच्या कार्यक्रमास प्राध्यापक श्रीधर साळुंखे रवींद्र झुटिंग ,डॉक्टर संदीप श्रोत्री, ज्योत्स्ना कोल्हटकर , डॉक्टर श्याम बडवे ,डॉक्टर आदिती काळमेख ,आनंद ननावरे ,बानूबी बागवान, युवराज पवार ,ओंकार पाटील ,सागर गायकवाड ,चंद्रकांत कांबिरे ,लता चव्हाण वगैरे मान्यवर उपस्थित होते .