जिल्ह्यात पावसाचा जोर कमी; कोयनेला १० मिलीमीटरची नोंद

0

कोयणानगर : जिल्ह्यात मागील सहा दिवसांपासून असलेला पावसाचा जोर कमी झाला आहे. गुरुवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत नवजा येथे सर्वाधिक २४ तर महाबळेश्वर येथे १२ आणि कोयनानगर येथे १० मिलीमीटर पावसाची नोंद झाली.
पूर्व भागातही तुरळक ठकिकाणी पाऊस पडला. सध्या पावसाचा जोर कमी झाल्याने धरणात अजून पाण्याची आवक होण्यास सुरुवात झाली नाही.

जिल्ह्यात मागील आठवड्यात मान्सूनचा पाऊस दाखल झाला. त्यामुळे सहा दिवस पाऊस पडत होता. पश्चिम भागातील कास, बामणोली, तापोळा, कोयना, नवजासह कांदाटी खोऱ्यात पावसाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे ओढे, नाले वाहू लागले आहेत. तसेच भात खाचरातही पाणी साचले. यामुळे शेतकऱ्यांची भात लागणीची गडबड सुरू झाली आहे. तर कोयना धरण पाणलोट क्षेत्रातही पावसाने चांगलीच हजेरी लावली. एक जूनपासून कोयनेला १८१ मिलीमीटर पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. तर नवजाला २२८ आणि महाबळेश्वर येथे १८३ मिलीमीटर पाऊस पडला आहे. तरीही अजुनही कोयना धरणात पाण्याची आवक सुरू झालेली नाही. सध्या धरणात १५.१७ टीएमसी एेवढा पाणीसाठा आहे. पाणीसाठ्याची टक्केवारी १४.४१ आहे. तर धरणातून होणारा विसर्ग पूर्णपणे बंद करण्यात आला आहे.
पूर्व भागातही चांगला पाऊस झाला आहे. माण, खटाव, फलटण, कोरेगाव, खंडाळा या तालुक्यात मागील सात महिन्यांपासून दुष्काळ होता. पाणी आणि चाऱ्याचा प्रश्न निर्माण झालेला. पण, मागील आठ दिवसांतील पावसाने सर्व चित्र बदलले आहे. या तालुक्यांतील जवळपास सर्वच भागात पावसाने हजेरी लावली. त्यामुळे ओढ्यांना पाणी वाहिले. रानात पाणी साचून राहिले. त्यामुळे खरीप हंगामातील पेरणीला वापसा आल्यानंतर सुरूवात होऊ शकते. तर मागील दोन दिवसांपासून जिल्ह्यात पाऊस कमी झाला आहे. काही ठिकाणीच तुरळक स्वरुपात पाऊस होत आहे. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here