मसूरला वीज वितरण कंपनीचा अजब कारभार
मसूर : वीजपुरवठा चालू नसतानाही हजारो रुपयांचे बिले घरपोच देऊन वीज वितरण कंपनीने ग्राहकाला जोर का झटका दिला आहे. नादुरुस्त ट्रान्सफॉर्मर चार वेळा बदलूनही तो अद्याप कार्यरत झाला नाही.
मात्र, बिल आले आहे. याबाबत ग्राहकाने केलेल्या वारंवार तक्रारीला महावितरणच्या अधिकाऱ्यांनी केराची टोपली दाखवली. अशा गलथान कारभारामुळे कंपनीचा सावळा गोंधळ चव्हाट्यावर आला आहे. वरिष्ठ अधिकारी नेमके काय करतात, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.मसूर (ता. कऱ्हाड) येथील माजी ग्रामपंचायत सदस्य व सामाजिक कार्यकर्त्या अनिता दिनकर बर्गे यांची शहापूर, मसूर हद्दीत शेती आहे.
बर्गे यांची शहापूर, मसूर हद्दीत शेती आहे. त्यांनी शेती पंपासाठी वीज कनेक्शन मिळण्यासाठी २०१४-१५ मध्ये डिपॉझिटची रक्कम भरली. तद्नंतर तब्बल आठ वर्षांनी त्यांना सिंगल ट्रान्सफॉर्मर वरून वीजजोडणी करून दिली आहे. हा ट्रान्सफॉर्मर जोडणी केल्यापासून फॉल्टी आहे. याबाबत वारंवार तक्रारी केल्यानंतर तो तब्बल चार वेळा बदलण्यात आला, तरीही आजअखेर ट्रान्सफॉर्मर कार्यरत नसून चार वर्षांपासून बंदच आहे. याबाबत अनेकदा तक्रारी करूनही त्याला केराची टोपली दाखवली आहे.
ट्रान्सफॉर्मर दुरुस्त कोणी करायचा याची जवाबदारी न घेता सातत्याने टोलवाटोलवी करण्यात येत आहे. यामध्ये शेतकरी हेलपाट्याने बेजार झाला असून, वीज कंपनीच्या चुकीमुळे शेतकऱ्याचे नुकसान झाले आहे. गेली अनेक वर्षे आर्थिक नुकसानीचा फटका त्याला बसत आहे. याला जबाबदार कोण? असा सवाल संबंधित ग्राहकाने केला आहे. एकीकडे शासन शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करतो म्हणते आणि दुसरीकडे वीज वितरण कंपनीचे अधिकारी मात्र शेतकऱ्याला वाकुल्या देत असतील तर दाद कुणाकडे मागायची, अशा प्रश्न आहे.
ग्रामस्थांचा इशारा
गेल्या चार वर्षांपासून नादुरुस्त असलेल्या ट्रान्सफॉर्मरच्या वीज वाहक तारा लोंबकळत आहेत. त्यामुळे तेथील अवस्था धोकादायक झाली आहे. याबाबत उपाययोजना न केल्यास ग्रामस्थांच्या वतीने वीज वितरण कंपनीच्या कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा देण्यात आला आहे.