अनिल वीर सातारा : छत्रपती संभाजीनगर येथील प्रा. डॉ. संतोष देशमुख यांच्या,” तिच्या सेल्फीत तो दिसत नाही.” या कवितासंग्रहाचे प्रकाशन शिवाजी विद्यापीठाचे माजी प्र. कुलगुरू प्राचार्य डॉ.अशोक भोईटे यांच्या हस्ते येथील दीपलक्ष्मी सांस्कृतिक हॉल येथे संपन्न झाले.
एकूण ५० कवितांचा कवितासंग्रह असून यात स्री भावविश्वाचा आलेख मांडलेला आहे. समाजाच्या महत्त्वाच्या असणाऱ्या स्री घटकाची उपेक्षितता आणि त्यामुळे तिच्या वाट्याला आलेलं अभावग्रस्त जगणं हा या कवितासंग्रहाचा आशय आहे. स्री दुःखाचे वेगवेगळे पदर कवीने कवितांद्वारे अधोरेखित केलेले आहे. मुलगी, पत्नी व आई या भूमिकांमधून वावरत असताना तिची होणारी मानसिक आंदोलने या कवितासंग्रहात टिपण्याचा प्रयत्न कवीने केलेला आहे.त्याबाबत बोलताना डॉ.संतोष देशमुख म्हणाले,”पुरुषांपेक्षा स्त्रियांचा संघर्ष पराकोटीचा असतो.महिला या कोणत्याही क्षेत्रातील असली तरी दुःख हे सारखेच असते. पुरुषांच्या वर्चस्वाला बळी पडणारी स्त्रीच असते.ती आयुष्यभर ओझ्याखाली जगत असते.”
डॉ.अशोक भोईटे म्हणाले, “सेल्फीचा माध्यमातून आधुनिक स्त्रीचे वर्णन आढळून येत आहे.जवळच्याच व्यक्तीने वेदना दिल्या तर वेदना होतात.”
या कवितासंग्रहास प्रसिद्ध कवयित्री प्रिया धारूरकर यांची प्रदीर्घ प्रस्तावना लाभलेली असून डॉ. महेश खरात यांनी मलपृष्ठ लिहून या कवितासंग्रहाची पाठराखण केली आहे. या कवितासंग्रहावर डॉ. महेश खरात (कवी, समीक्षक, कादंबरीकार), माननीय कांता भोसले (लेखिका व कवयित्री), ॲड सीमंतिनी नुलकर (लेखिका) या मान्यवरांनी भाष्य केले. शिरीष चिटणीस (कार्यवाह, म.सा.प. पुणे) यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.सरच्या कार्यक्रमास मनोहरराव देशमुख,मनीष खरात,भरत जाधव,कांता भोसले,आनंद ननावरे, ऍड. जितेंद्र पिसाळ, शुभांगी दळवी, भरत जाधव,शुभम बल्लाळ, बाळकृष्ण इंगळे, जगदीश खंडागळे,अनिल वीर आदी विविध क्षेत्रातील मान्यवर व साहित्यिक मोठ्या संख्येनी उपस्थीत होते.पुरुषोत्तम वाकडे यांनी सूत्रसंचालन केले तर मनोहर देशमुख यांनी आभार मानले.