पोहायला गेलेल्या दोघांचा विहिरीत बुडून मृत्यू, गावावर शोककळा

0

कराड : पोहायला गेलेल्या दोघांचा विहिरीत बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना करवडी (ता- कराड) येथे घडली आहे. राजवर्धन किशोर पाटील (वय-२२) आणि राजेंद्र कोळेकर (वय-५५) अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत.
एकाच गावातील दोन व्यक्तींचा दुर्दैवी अंत झाल्यामुळे करवडी गावावर शोककळा पसरली आहे.

अधिक माहितीनुसार, करवडी गावाच्या हद्दीत भटकी नावाच्या शिवारात सह्याद्री साखर कारखान्याचे माजी संचालक किशोर पाटील आणि त्यांच्या बंधूंची शेत जमीन आणि विहीर आहे. या विहिरीवर सुरू असलेली मोटर बंद करण्यासाठी किशोर पाटील यांचा मुलगा राजवर्धन आणि त्यांच्या शेतात काम करणारे कर्मचारी राजेंद्र कोळेकर दुपारी तीन वाजताच्या सुमारास गेले होते.

मोटर बंद केल्यानंतर राजेंद्र कोळेकर याला पोहण्याची इच्छा झाली. त्यावेळी परवानगी घेण्यासाठी राजवर्धन यांनी फोनवरून वडिलांना तशी कल्पना दिली. मात्र दुपारची वेळ आहे विहिरीत उतरू नका असे वडिलांनी सांगितले. मात्र फोन बंद झाल्यानंतर राजवर्धन आणि राजेंद्र कोळेकर हे पोहण्यासाठी पाण्यात उतरले.

दरम्यान १५-२० मिनिटे झाल्यानंतर किशोर पाटील यांनी मुलगा राजवर्धन आणि राजेंद्र यांना घरी येण्यासाठी फोन केला. मात्र अनेकदा फोन करूनही त्यांनी फोन न उचलल्यामुळे शेवटी किशोर पाटील दुचाकीवरून शेताकडे आले. विहिरीच्या बाहेर शेजारी दोघा जणांचे कपडे, चपला त्यांना आढळून आल्या. शंका आल्यानंतर त्यांनी ग्रामस्थांना आणि घरातील लोकांना फोन करून बोलावून घेतले. त्यानंतर ग्रामस्थांनी शोध मोहीम सुरू केली.

विहिरीत मोठ्या प्रमाणात पाणी असल्यामुळे ग्रामस्थांनी विहिरीतील सर्व सहा मोटर सुरू करून पाणी उपसण्याचा प्रयत्न केला. मात्र वीज पुरवठा बंद झाल्याने आणि विहीर खोल असल्यामुळे संपूर्ण पाणी उपसता आले नाही. शेवटी कराडमधील मासेमारी करणाऱ्या युवकांना बोलवण्यात आले. त्यांनी पाण्यामध्ये उतरून राजवर्धन आणि राजेंद्र कोळेकर यांचे मृतदेह बाहेर काढले.

कराड तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा करण्याचे आदेश दिले. पोस्टमार्टम झाल्यानंतर या दोघांचे मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. रात्री उशिरा करवडी गावात या दोघांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

राजवर्धन हा बारावीनंतर आळंदी येथील एमआयटीमध्ये कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत होता. तिसऱ्या वर्षातील दुसऱ्या सेमिस्टर परीक्षा संपल्यानंतर तो घरी आला होता. राजवर्धन गावाकडे आल्यानंतर वडिलांना शेतीमध्ये मदत करायचा. दरम्यान किशोर पाटील यांच्या एकुलत्या एक मुलाच्या दुर्दैवी मृत्यूमुळे करवडी गावावर शोककळा पसरली आहे. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here