सातारा/अनिल वीर : बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने भटकंती सह्याद्री परिवार व सह्याद्री लेणी संवर्धक यांच्या विद्यमाने रेणोशी वस्ती, कांबटवाडी धावडी, ता.वाई,जि.सातारा येथे महाबुद्धवंदनेचे आयोजन करण्यात आलं होते.
भारतात असलेल्या १२०० हून अधिक असलेल्या लेण्यांपैकी ८०० च्या आसपास बुद्ध लेण्या आपल्याला महाराष्ट्रात पहायला मिळतात. बुद्ध संस्कृतीचा वैभवशाली वारसा आपल्याला याच लेण्या,शिल्प व शिलालेखामधून पहायला मिळतो.अशीच प्राचीन वारसा व संस्कृतीने सजलेली जिल्ह्यातील वाई तालुक्याची भूमी आहे.हा वारसा अबाधित राखून आहे. सातवाहन कालीन प्रमुख व्यापारी मार्गांवर असलेल्या लेण्यापैकी वाई परिसरातील लेण्या या देखील सह्याद्रीच्या कुशीत आपलं अस्तित्व टिकवून उभ्या आहेत. हजारो वर्षापासून हाच वारसा जतन करण्यासाठी वाईतील युवक कार्य करत आहेत. भटकंती सह्याद्रीचा परिवार संचलित सह्याद्री लेणी संवर्धक समूहातील सौरभ जाधव,रोहित मुंगसे,रोहित वाघमारे,अक्षय कांबळे,संग्राम खरात,सागर मोरे,प्रमोद भिसे,प्रेम जाधव,पंकज,अल्केश सोनावणे, सागर गायकवाड आदींनी दुर्ग संवर्धक व लेणी संवर्धक युवकांनी मंगलमय वातावरणात कार्यक्रम पार पाडला.