महाबळेश्वरमध्ये महिला दिनानिमित्त भव्य रॅली आणि लोकसंगीताचा कार्यक्रम..

0

जागर नारी शक्तीचा २०२५’ चा जल्लोष!

महाबळेश्वर प्रतिनिधी : ८ मार्च जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महाबळेश्वर गिरिस्थान नगरपरिषदेने महिलांच्या सन्मानार्थ ‘जागर नारी शक्तीचा २०२५’ या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमात महिलांसाठी भव्य रॅली आणि ‘लोकसंगीताचा नजराणा’ या मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवणारी भव्य रॅली:

८ मार्च २०२५ रोजी दुपारी ३:०० वाजता बस स्थानक मार्गे रॅलीला सुरुवात होणार आहे. ही रॅली नेताजी सुभाषचंद्र बोस चौक, डॉ. साबणे रोड, छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे पोलीस परेड ग्राउंड येथे समाप्त होईल. शहरातील विविध प्रभागातील महिलांच्या ११ गटांनी या रॅलीत सहभाग घेतला आहे. या रॅलीमध्ये भारत देशातील विविध राज्यांच्या, विशेषतः महाराष्ट्राच्या विविध संस्कृतीच्या वेशभूषा आणि परंपरांचे दर्शन घडवले जाईल. ढोल-ताशा, लेझीम, मंगळागौर, महाराष्ट्रातील विविध सण, महिला वारकऱ्यांची दिंडी यांसारख्या सांस्कृतिक कार्यक्रमांचा समावेश असेल. रॅलीचे खास आकर्षण म्हणजे गिरिस्थान प्रशालेच्या मुलींचा छत्रपती शिवाजी महाराजांचा देखावा असलेला चित्ररथ.

लोकसंगीताचा मनोरंजक कार्यक्रम:

सायंकाळी ६:०० ते ९:०० वाजेपर्यंत महिलांसाठी ‘लोकसंगीताचा नजराणा’ या मनोरंजक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात महिलांना लोकसंगीताचा आनंद घेता येईल.

महिलांना सहभागी होण्याचे आवाहन:

महाबळेश्वर गिरिस्थान नगरपरिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी श्री. योगेश पाटील यांनी महाबळेश्वर शहरातील जास्तीत जास्त महिलांनी या कार्यक्रमात सहभागी होऊन कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here