वाई : मला आमदारकी किंवा सत्तेचा माज नाही. कै. किसन वीर आबांनी उभारलेली सहकार मंदिरे वाचविण्यासाठी आणि मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी मी सत्तेत सहभागी झालो. त्यामुळे मी गद्दारी करण्याचा प्रश्नच नाही, मला सत्तेची हाव असती तर मी कॅबिनेट मंत्री झालो असतो, असे वाई मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार मकरंद पाटील यांनी स्पष्ट केले. वाई येथे झालेल्या विराट सांगता सभेत आ. पाटील बोलत होते.
याप्रसंगी खासदार उदयनराजे भोसले, खासदार नितीन पाटील, ज्येष्ठ नेते बकाजीराव पाटील, दत्तानाना ढमाळ, प्रमोद शिंदे, विजय नाईकवडी, श्रीमती सुमनकाकी पाटील, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड, शिवसेनेच्या महिला जिल्हाध्यक्ष शारदा जाधव, उदय कबुले, राजेंद्र तांबे, राजेंद्र राजपुरे, शामराव गाडवे, मनोज पवार, अनिल भिलारे, विजय ढेकाणे, अनिल सावंत, अमित वनारसे, प्रशांत नागपूरकर आदी उपस्थित होते. आ. पाटील म्हणाले की तुम्ही माझे १५ वर्षातील काम, संपर्क पाहिलाय. मतदारसंघातील प्रत्येक गावाचा विकास मी केलाय. तीर्थक्षेत्र विकासाचे काम करण्याचा प्रयत्न केला आहे. माझ्याकडे आलेल्या प्रत्येक माणसाला पक्ष, गट, तट न बघता न्याय देण्याचा प्रयत्न केला. करोना काळात गावागावांमध्ये प्रत्येकाला मदत केली. लोकांची सेवा केली. आज जी मंडळी निवडणुकीत उभी आहेत, त्या काळात ती कुठे होती. अतिवृष्टीच्या संकटात अहोरात्र काम करून मी आपदग्रस्तांना दिलासा दिला. त्यावेळी आता ओरडणारे विरोधक कुठे होते, असा प्रश्न त्यांनी केला. येणाऱ्या काळात कै. लक्ष्मणराव पाटील यांच्या नावाने सर्व सुविधा असलेले भव्य हॉस्पिटल सुरू करणार आहे. त्या हॉस्पिटलमध्ये गरीब माणसासाठी मोफत उपचार करणार, शी ग्वाही त्यांनी दिली. उदयनराजे भोसले यांनी नाव न घेता शरद पवार यांच्यावर हल्ला चढविला.
ते म्हणाले की, तुम्ही तर यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील यांच्या पाठीत खंजीर खुपसून त्यांच्याशीच गद्दारी केली. तुम्ही ६० वर्ष सत्तेत होता तेव्हा फक्त घोषणाच केल्या, केलेल्या घोषणांची अंमलबजावणी केली नाही. तुम्ही लोकांना फक्त फसवल आहे. आबांसारखा काम करणारा नेता नाही. प्रगतीचे दुसरे नाव मकरंद आबा आहे. शिवसेनेच्या जिल्हाध्यक्ष शारदा ताई जाधव, मराठा महासंघाचे अध्यक्ष विक्रम वाघ, मनीषाताई गाडवे, राजेंद्र राजपुरे, प्रताप आण्णा पवार, अशोकराव गायकवाड, नितीन भुरगुडे पाटील आदींनी आपल्या मनोगतात मकरंद पाटील यांना विजयी करण्याचे आवाहन केले. यावेळी वाई तालुका काँगेसचे युवा अध्यक्ष प्रमोद अनपट, पुरुषोत्तम जाधव यांचे पुतणे सागर जाधव, गुळुंब येथील गणेश जाधव, वेळे येथील ॲड. उमेश पवार यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
गावोगावी कामे करणारे मकरंद आबा गद्दार कसे?
उदयनराजे भोसले म्हणाले, की ज्येष्ठत्वाच्या नात्याने आम्ही शरद पवार यांचा खूप आदर करतो. पण कधी बोलायचं कस बोलायचं याच भान त्यांनी ठेवायला पाहिजे. ज्या पाटील कुटुंबीयांनी तुमच्यासाठी आयुष्य वेचलं आहे, तुमचं हित जपलं. तो माणूस गद्दार कसा असेल. ज्या मकरंद आबांनी गावोगावी कोट्यवधी रुपयांची विकासकामे मार्गी लावली. ते आबा गद्दार कसे असतील.