सातारा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुरुषोत्तम जाधव यांना सातारा लोकसभेची निवडणूक लढण्यास ग्रीन सिग्नल दिला आहे. काल नायगाव येथील कार्यक्रम संपल्यावर हेलिकॉप्टरमध्ये बसताना जाधव यांनी सर्वासमोरच मुख्यमंत्र्यांना याबाबत सांगितले, त्यांनी होकार देत सातारा लोकसभा लढूया, तयारी करा असे सांगितले.
सातारा लोकसभा मतदारसंघावरून सध्या महायुतीत रस्सीखेच सुरू आहे. भाजपने या मतदारसंघात आपलाच खासदार सर्वाधिक मताधिक्याने निवडून आणण्याचा चंग बांधला आहे. तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम जाधव यांनी तोफ डागत सातारा लोकसभेवर शिवसेनेचा हक्क असून यावेळेस या मतदारसंघातुन निवडणूक लढविण्याची तयारी केली आहे.
तर उपमुख्यमंत्री अजित पवार गट ही या मतदारसंघावर दावा सांगत आहे. त्यासाठी आमदार मकरंद पाटील यांचे बंधू नितीन पाटील हे इच्छुक आहेत. त्यांच्यासाठी अजितदादांना हा मतदारसंघ हवा आहे. त्यातच भाजपचे नेते व अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी यापूर्वीच पक्षाने संधी दिल्यास लोकसभा लढणार म्हणून शड्डू ठोकला आहे.
पण शिवसेनेच्या वतीने पुरुषोत्तम जाधव यांनी तर पूर्ण तयारी सुरू केली आहे. काल खंडाळ्यातील सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आले होते. त्यावेळी कराड शहर तसेच कराड उत्तर व दक्षिण मतदारसंघातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेऊन सातारा लोकसभेवर शिवसेनेचा हक्क असून यावेळेस पुरुषोत्तम जाधव यांनाच उमेदवारी द्यावी, अशी आग्रही मागणी केली.
दरम्यान, मुख्यमंत्री नायगाव येथील कार्यक्रम संपवून परत जाताना हेलिपॅडवर जिल्हा प्रमुख पुरुषोत्तम जाधव यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली व सर्व नेत्यांपुढेच त्यांनी सातारा लोकसभेवर शिवसेनेचा हक्क असून या मतदारसंघातून मी इच्छुक असल्याचे त्यांनी सांगितले. त्यावर मुख्यमंत्र्यांनी असे असेल तर आता सातारा लोकसभेची निवडणूक आपण लढू या, तुम्ही तयारी करा..! असे सांगितले.
त्यामुळे उपस्थित नेत्यांचे चेहरे बघण्यासारखे झाले होते. यातून मुख्यमंत्र्यांनी श्री. जाधव यांना सातारा लोकसभेसाठी ग्रीन सिग्नल दिला आहे. त्यांचा निवडणूक लढण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आता भाजप व अजितदादा गट राष्ट्रवादी कोणती भूमिका घेणार याची उत्सुकता आहे.