राधानगरी : महाराष्ट्र राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने रौद्र रुप धारण केलंय. अनेक ठिकाणी नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली असून काही ठिकाणी पूर देखील आलाय. अशातचं, कोल्हापुर जिल्ह्यातील राधानगरी धरणाच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे. पाणी पातळी वाढल्याने धरणाछ्या दोन दरवाजांमधून ४२५६ क्युसेक वेगाने विसर्ग सुरु करण्यात आला आहे.
महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यांमध्ये सध्या मुसळधार पाऊस सुरु आहे. विदर्भात अनेक नद्यांना पूर आलाय. तर बुलढाणा जिल्ह्यातही पावसाने हैदोस घातलाय. नदीला आलेल्या पूरात एक व्यक्ती वाहून जाताना दिसला, त्याला वाचवण्यात यश आलंय.
सध्या चंद्रपुर शहरामध्ये पूराने हाहाकार माजवला आहे. या ठिकाणी २४ तासांपासून जोरदार पाऊस सुरु आहे. पूरामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. इरई धरणातून विसर्ग सुरु करण्यात आलाय.
त्याचबरोबर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस कोसळंत आहे. यामध्ये गोंदिया, गडचिरोली यांचा समावेश आहे.
गंगापूर धरणाच्या पाणीसाठ्यात आठ टक्क्यांनी वाढ
नाशिक : यावर्षीच्या हंगामात पहिल्यांदाच गंगापूर धरणातून पाणी सोडण्यात आले आहे. काल सायंकाळी धरणातील पाणीसाठा वाढल्याने पाचशे क्यूसेक पाणी सोडण्यात आले. रात्री धरण पाणी पातळीत आठ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
सातारा जिल्ह्यात सरासरी 11.8 मि.मी. पावसाची नोंद
सातारा – जिल्ह्यात सरासरी 11.8 मि.मी. पावसाची नोंद झाली असून 1 जूनपासून आतापर्यंत एकूण सरासरी 373.1 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. हा पाऊस एकूण सरासरीच्या 42.1 टक्के इतका आहे. तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे. सर्व आकडे मि.मी.मध्ये असून कंसातील आकडे आतापर्यंतच्या एकूण पावसाचे आहेत. सातारा – 11.1 (384.7), जावली-मेढा – 16.9(684.0), पाटण -23.2 (711.2), कराड -13.4 (210.4), कोरेगाव – 5.8 (171.7), खटाव – वडूज – 6.7 ( 136.2), माण – दहिवडी -2.4 (117.8), फलटण – 3.2 (86.0), खंडाळा -4.1 (123.7), वाई -9.5 (288.2), महाबळेश्वर -41.4 (1950.1) या प्रमाणे पाऊस झाला आहे.