फलटण : सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर आणि गोविंद डेअरीवरील इनकम टॅक्स विभागाची कारवाई पाच दिवसांनंतर थांबली आहे. त्यानंतर संजीवराजे यांचे चुलत बंधू आणि विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी आपल्या ‘व्हॉट्स अप’ला एक स्टेट्स ठेवले आहे.
त्या स्टेट्सच्या माध्यमातून रामराजेंनी कोणाला इशारा दिला आहे, असा सवाल राजकीय वर्तुळात विचारला जात आहे.
रामराजे नाईक निंबाळकर यांनी आपल्या ‘व्हॉट्सअप’वर ‘सुरुवात तुम्ही केली आहे, शेवट मी करणारच…’ असे स्टेटस ठेवले आहे. या स्टेट्सच्या माध्यमातून रामराजेंचा रोख नेमका कोणाकडे आहे, याबाबत तर्कवितर्कांना उधाण आले आहे. रामराजेंचे बंधू संजीवराजे नाईक निंबाळकर यांची तब्बल पाच दिवस गोविंद दूध डेअरीमधील व्यवहाराच्या अनुषंगाने चौकशी सुरू होती.
संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्याकडील चौकशी रविवारी संध्याकाळी संपली. त्यानंतर फलटणमध्ये राजे गटाने जल्लोष केला होता. इनकम टॅक्स विभागाची पाच दिवसांची चौकशी संपल्यानंतर आज सकाळी रामराजे नाईक निंबाळकर यांनी ठेवलेल्या व्हाट्स अप स्टेटस वरून हा नेमका इशारा कोणाला, याबाबत आता राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.
संजीवराजेंनी सांगितली 5 दिवसांची इनसाईड स्टोरी
दरम्यान, लोकसभा निवडणुकीत फलटणमधील रामराजे गटाने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या माढ्यातील उमेदवाराला मदत केली होती. तसेच, विधानसभा निवडणुकीच्या काळात तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उमेदवारी जाहीर करूनही तत्कालीन आमदार दीपक चव्हाण यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवली होती. हेच राजकीय गणित संजीवराजे यांच्यावरील छापेमारीमागे असल्याची कुणकुण साताऱ्यात आहे.
माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि माण खटावचे आमदार आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्याशी फलटणच्या रामराजे नाईक निंबाळकर कुटुंबीयांशी असलेले नाते सर्वश्रूत आहे. गोरे आणि माजी खासदार निंबाळकर हे रामराजेंच्या कुटुंबीयावर कुरघोडी करायची एकही संधी सोडत नाहीत, त्या वादाचीच किनार या छापेमारीला असल्याची चर्चा आहे.
माजी सभापती रामराजे यांनी आपल्या विरोधकांना या स्टेट्सच्या माध्यमातून संदेश दिल्याचे मानले जात आहे. इनकम टॅक्सची छापेमारी झाली असली तरी आम्ही संघर्ष करायला तयार आहोत, असे सांगून रामराजेंनी कार्यकर्त्यांना एक प्रकार संघर्षासाठी तयार राहण्याचे सूचक इशारा दिल्याचे मानले जात आहे. त्यामुळे दोन निंबाळकरांमधील राजकीय संघर्ष कुठपर्यंत जाणार, हे आता पाहावे लागणार आहे.